Rambhakti Was Crime : मुलायम सिंह यादव सरकारच्या काळात रामभक्ती करणे, हा गुन्हा होता !

  • कारसेवकांना पाठवले होते कारागृहात : सुटल्यावर मिळत होते ‘रामभक्ती चालान’ असे लिहिलेले गुन्हेगारी प्रमाणपत्र !

  • काही कारसेवकांनी आता उघड केली माहिती !

अलीगड (उत्तरप्रदेश) : समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह तत्कालीन सरकारमध्ये रामभक्ती करणे हा गुन्हा होता. त्या वेळी कारसेवकांना कारागृहात पाठवण्यात आले होते. कारागृहातून बाहेर पडतांना त्यांना गुन्हेगारी प्रमाणपत्र देण्यात येत होते. त्या प्रमाणपत्रावर ‘रामभक्ती चालान’ असे लिहिले जात होते. अलीगड जिल्ह्यातील अनुमाने ४०० कारसेवकांना अशी ‘गुन्हेगारी प्रमाणपत्रे’ देण्यात आली होती. कारसेवकांनी त्या वेळची परिस्थिती कथन करतांना ही माहिती दिली.

‘रामभक्ती चालान’ असे लिहिलेले गुन्हेगारी प्रमाणपत्र !

कारसेवक मनोज अग्रवाल, अर्जुन देव वार्ष्णेय आणि अनुराग वार्ष्णेय यांनी सांगितले की, १९९० चे वर्ष होते. अयोध्येत कारसेवा करण्यासाठी देशभरातून कारसेवक जमले होते. तेव्हा उत्तरप्रदेश राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार होते. मुलायम सिंह यादव मुख्यमंत्री होते. सरकारच्या आदेशाने कारसेवा करण्यासाठी जाणार्‍या लोकांची धरपकड चालू झाली. अलीगडमध्ये शेकडो कारसेवकांना पोलिसांनी कारागृहात टाकले आणि कारागृहातून सुटल्यावर त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात आले, ज्यावर गुन्ह्याच्या रकान्यात ‘रामभक्ती चालान’ असे लिहिले होते.

कारसेवकांमध्ये अलिगढचे मनोज अग्रवाल, अर्जुन देव वार्ष्णेय आणि अनुराग वार्ष्णेय यांचा समावेश आहे.

कपाळावर टिळा लावायला भीती वाटत होती ! – मनोज अग्रवाल

‘त्या वेळी विश्‍व हिंदु परिषदेने अयोध्येत कारसेवेची हाक दिली होती. आमचा १५० जणांचा गट कारसेवेसाठी अयोध्येला निघाला होता. आम्हाला वाटेत थांबवण्यात आले आणि अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. कुणी भगवे कपडे घालून बाहेर पडला, तर त्याच्याकडे संशयाने पाहिले जात होते. आम्हाला कपाळावर टिळा लावायलाही भीती वाटत होती’, असे मनोज अग्रवाल यांनी सांगितले.

१० दिवस कारागृहात डांबून ठेवले ! – अर्जुन देव वार्ष्णेय

पोलिसांनी आम्हाला १० दिवस कारागृहात डांबून ठेवले. सुटका झाल्यानंतर आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून गुन्हेगारी प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्यात अटकेमागे ‘रामभक्ती’ हे कारण असल्याचे लिहिले होते, असे अर्जुन देव वार्ष्णेय यांनी सांगितले.

पोलिसांच्या मारहाणीमुळे माझा पाय मोडला ! – अनुराग वार्ष्णेय

अयोध्येला जातांना पोलिसांनी काठीने केलेल्या मारहाणीमुळे माझा पाय मोडला. पोलीस ठाण्यात नेऊन माझा छळ केला. त्यानंतर मला कारागृहात पाठवले. पाय मोडलेल्या स्थितीत मी कारागृहात दिवस काढले. १२ दिवस मला कारागृहात ठेवून नंतर माझी सुटका करण्यात आली, असे अनुराग वार्ष्णेय यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठांनी अशी स्थिती होणे हिंदूंना लज्जस्पद ! हिंदूंकडे कुणाचे वक्र दृष्टीने पहाण्याचेही धाडस होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !