Sunburn Denigration Bhagwan Shiva : ‘सनबर्न’मध्ये भगवान शिवाचे विडंबन !

आपचे नेते अधिवक्ता अमित पालेकर पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार

आपचे नेते अधिवक्ता अमित पालेकर

पणजी : मद्य आणि अमली पदार्थ यांचे सेवन करून धुंदीत नाचण्याच्या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमात महादेवाचे चित्र पडद्यावर लावून नृत्य केले जात आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याने आम आदमी पक्षाचे समन्वयक अधिवक्ता अमित पालेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तसेच या प्रकाराच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

अधिवक्ता अमित पालेकर याविषयी म्हणाले, ‘‘सनबर्नसारख्या कार्यक्रमात कुठल्याच धर्माच्या देवतांना आणू नये. तेथे सनातन धर्मातील माझे आराध्य दैवत भगवान महादेवाचे चित्र दाखवून त्यांच्यासमोरच नृत्य केले आहे. हा सर्व हिंदूंच्या भावनांशी खेळ आहे. सनबर्न कार्यक्रमाला अगोदरच लोकांचा विरोध आहे. तरीही सरकारसह साटेलोटे करून हा संगीत कार्यक्रम राज्यात आयोजित केला जातो. यात मद्य आणि अमली पदार्थ यांचे सेवन होत असते. असे असतांनाही कुठेच लोकांच्या भावनेचा विचार न करता अशा प्रकारे देवाचे चित्र लावून नृत्य करणे कितपत योग्य आहे ? पोलीस महासंचालकांनी यात लक्ष घालून हे रोखावे.’’

अधिवक्ता अमित पालेकर भाजपवर टीका करतांना म्हणाले, ‘‘भाजप सनातन धर्माविषयी बोलत आहे. त्यांना हा सनातन धर्माचा अपमान दिसत नाही का ? केवळ स्वार्थासाठी भाजप सनातन धर्माचा वापर करतो; पण आम आदमी पक्ष असे प्रकार खपवून घेणार नाही.’’

संपादकीय भूमिका

लोकांना व्यसनी बनवणार्‍या ‘सनबर्न’मध्ये देवतांचे विडंबन होणारच ! त्यामुळे अशा कार्यक्रमांवर कायमची बंदी घालणेच सर्वथा योग्य !