मडगाव येथील लोहिया मैदानात झालेल्या ‘गोंयकार एक पावल एकचाराचे’ या सभेत वक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांवर गरळओक केल्याचे प्रकरण
पणजी (पत्रक) : भाजप विरोधक आणि श्रीराममंदिराला विरोध करणारे राजकीय पक्ष यांना लोकसभेच्या निवडणुकीत पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अन् गोव्यातील ‘जातीय सलोखा’ बळकट करण्याच्या नावाखाली ‘गोंयकार एक पावल एकचाराचे’ या मंचावर मडगावच्या लोहिया मैदानात झालेली सभा ही सर्वधर्मीय सलोख्यासाठी नसून ती रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटनांविरुद्ध केवळ विषारी गरळ ओकण्यासाठी घेण्यात आली होती, हे जनतेसमोर प्रमाणित झाले आहे. या सभेतील सर्व हिंदुविरोधी वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार नोंदवत आहोत, असे ‘भारतमाता की जय संघा’चे संस्थापक मार्गदर्शक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
प्रा. वेलिंगकर यांनी या पत्रकात म्हटले आहे की,
१. मातृभाषा रक्षणाच्या आणि चर्चच्या इंग्रजी शाळांना अनुदान देण्याच्या प्रश्नावर जरी आम्ही असंख्य संघ कार्यकर्ते गोव्याच्या रा.स्व. संघाच्या यंत्रणेच्या बाहेर पडून ‘भारतमाता की जय संघ’ या संघटनेचे काम करत असलो, तरी आम्ही संघस्वयंसेवकत्व, संघाचे विचार आणि तत्त्वज्ञान सोडलेले नाही. समान भगवा ध्वज, आचारपद्धत आणि तीच प्रार्थना घेऊन काम करत आहोत. ऊठसूट हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर देशद्रोहाचे आरोप करणार्या आणि ‘जातीय सलोखा जणू हिंदूंनी बिघडवला आहे’, असे भासवणार्या ‘एक पावल एकचाराचे’ या निंद्य आणि सलोखा बिघडवणार्या प्रयत्नांचा आम्ही कडाडून धिक्कार करतो.
२. काँग्रेस सरकारने त्यांच्या सत्ताकाळात राज्यघटनेत किमान ९२ वेळा मोडतोड करून त्यात त्यांना आवश्यक ते पालट केले आहेत. श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणीतच ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द राज्यघटनेत घुसडले होते, हे ‘एकचार’वाले विसरले काय ? काँग्रेसने सर्वाेच्च न्यायालयात ‘रामायण’ हे सत्य नव्हे, थोतांड आहे’, असे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतरही श्रीराममंदिर अयोध्येत मूळ जागीच स्थापन करणारे सरकार जनसमर्थनामुळे अधिकारावर आलेच ना ?
३. धर्माच्या आधारावर देश तोडून मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला. उरलेला स्वभाविकपणे ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावा, अशी हिंदूंची भावना असली, तर तो ‘देशद्रोह’ होतो, हे ठरवणारे तुम्ही कोण ? लोकभावना विजयी झाली आणि राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ही घोषित झाले, तरी लोकशाहीत ते कायदेशीर ठरणार नाही, असे तर ‘एकचार’वाल्यांचे म्हणणे नाही ना ?
४. फातोर्डा येथे केंद्रशासनाने बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी जिहादी संघटनेची राजकीय शाखा ‘एस्.डी.पी.ओ.’ या पक्षाची स्थापना करण्यासाठी जमलेल्या किमान अडीच सहस्र मुसलमान समाजाने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्या ‘एकचार’वाल्यांना ऐकू आल्याच नाहीत का ? मडगावमध्ये ‘श्रीराममंदिर तोडून पुन्हा बाबरी उभारू’, या आशयाचे पोस्टरही सर्वत्र लावले गेले.
५. पॉप्युलर फ्रंटच्या वर्चस्वाखालील रुमडामळ पंचायतीत चाललेली दादागिरी आणि धुमाकूळ ‘जातीय सलोखा कसा बिघडवत आहे’, हे ठाऊकच नाही का ?
६. गोवा मुक्तीदिनी सुकुर मेंदीश हा पाद्री देशद्रोहाचे पोर्तुगीजधार्जिणे भाषण देतो, रेक्टर फादर व्हिक्टर फेर्राव ‘पोर्तुगिजांनी पाडलेली मंदिरे हिंदूंची नव्हती, अन्य पंथियांची होती’, असा चक्क खोटा इतिहास प्रसृत करतो. गोव्याची जनता आराध्य दैवत मानत असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान फादर बोलमॅक्स हा पाद्री करतो.
या सर्व घटना ‘अराष्ट्रीय’ या सदरात येतात. त्यांची सरमिसळ जातीय सलोख्याशी मुद्दाम हेतूपुरस्सर का केली जात आहे ? अराष्ट्रीय कृत्यांना मग ती कोणत्याही धर्मियाकडून होवोत, विरोध झालाच पाहिजे. खरे म्हणजे सर्व धर्मियांनी या कृत्यांचा विरोध केलाच पाहिजे; मात्र ते तो करत नाहीत; परंतु ‘प्रतिक्रिया देणारेच जातीय सलोखा बिघडवतात’, असे एकचार वक्त्यांचे म्हणणे दिसते. हिंदु समाजाला लक्ष्य करून राजकारण प्रभावी मंचावर टाळ्या मिळवण्यासाठी ऊठसूट शिंतोडे उडवणे आता बंद करावे.