फोंडा येथील आल्मेदा विद्यालयात मुलांच्या हातातील राख्या काढल्याचे प्रकरण
फोंडा, ७ सप्टेंबर (वार्ता.) – ‘यापुढे विद्यार्थ्यांना हातात राखी बांधून शाळेत येण्यास अनुमती असेल !’, असा संदेश फोंडा येथील आल्मेदा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने पालकांना पाठवला आहे. विद्यालयाच्या व्यवस्थापनाने या संदेशात म्हटले आहे, ‘‘विद्यालयाने यापूर्वी पालकांना पाठवलेला संदेश हा कुठल्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा हेतूने पाठवला नव्हता. विद्यार्थी आणि विद्यालय यांच्या हिताच्या दृष्टीने विद्यालयाने हा निर्णय घेतला होता. यापुढे विद्यार्थी घरून येतांना हातात राखी बांधून येऊ शकतात.’’ विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या नावाने हा संदेश पालकांच्या सामाजिक माध्यमातील गटात पाठवण्यात आला आहे.
यापूर्वी आल्मेदा विद्यालयाने रक्षाबंधनाच्या दिवशी ‘विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी शाळेत येतांना हातात राखी बांधून येऊ नये’, असा संदेश पालकांना पाठवला होता.
(सौजन्य : In Goa 24×7)
तसेच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील राख्या काढण्यात आल्या होत्या. या प्रकारांमुळे पालकवर्गात असंतोष निर्माण झाला. पालकांच्या तक्रारी आल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने आल्मेदा हायस्कूलच्या व्यवस्थापकीय मंडळाची भेट घेऊन मुलांना राख्या काढण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणी तक्रार नोंदवली होती आणि या कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले होते. दोषींवर कारवाई करून संबंधितांनी विनाअट क्षमा मागावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा मुख्याध्यापिकेला घेराव
फोंडा – रक्षाबंधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना ‘हातात राखी बांधून येऊ नका’, असे सांगणार्या फोंडा येथील आल्मेदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ७ सप्टेंबर या दिवशी घेराव घातला. या वेळी मुख्याध्यापकांना या कृतीविषयी खडसावण्यात आले.
संपादकीय भूमिकाराख्या काढण्यास सांगणार्या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे. |