|
फोंडा, १० जुलै (वार्ता.) – गोव्यात इयत्ता ७ वीच्या ‘सामाजिक विज्ञान – इतिहास’ या पाठ्यपुस्तकात ‘महान मोगल’ (द ग्रेट मुघल) या शीर्षकाखाली एक धडा (धडा क्रमांक ५) आहे. यामध्ये मोगलांनी २ शतके भारतावर चांगल्या रितीने राज्य केल्याचे आणि चांगले व्यवस्थापन निर्माण केल्याचे म्हटले आहे. या धड्यात पहिल्या ६ मोगल राजांना ‘महान मोगल’ (द ग्रेट मुघल) असे संबोधण्यात आले आहे. यामध्ये या मोगल राजांनी लढलेल्या लढाया आदींचे विवरण आहे; मात्र मोगलांनी तलवारीच्या जोरावर हिंदूंचा केलेला नरसंहार, मंदिरांचा विध्वंस करून त्या ठिकाणी मशिदी उभारणे, हिंदु महिलांवर केलेले अनन्वित अत्याचार, धर्मांतर याविषयी एक शब्दही लिहिलेला नाही.
मोगलांचा उदो उदो करणारी पाठ्यपुस्तकातील काही सूत्रे
१. पाठ्यपुस्तकात धडा क्रमांक १ हा ‘द मेडिवल वर्ल्ड’ (मध्ययुगीन जग) या नावाने आहे. या धड्यात ‘वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक घडामोडी’ या शीर्षकाखाली पुढील माहिती दिली आहे – भारतात मुसलमान आल्याने येथे संमिश्र संस्कृती उदयास आली. यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील लोक, तसेच हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये समन्वय साधला गेला. विभागीय आणि जातीय भेद बाजूला सारून संस्कृतीची देवाणघेवाण झाल्याने संस्कृती वृद्धींगत झाली. ही भारतीय संस्कृती आहे.
२. या धड्यामध्ये अल-बेरूनी म्हणतो, ‘‘हिंदू ऐतिहासिक घडामोडी योग्य क्रमाने पुढे याव्यात, याकडे दुर्लक्ष करतात. यासंबंधी हिंदू निष्काळजी आहेत. यासंबंधी हिंदूंकडे माहिती मागितल्यास त्यांना काय सांगावे ? हे माहिती नसते आणि ते अनावश्यक गोष्टी सांगायला लागतात.’’ विशेष म्हणजे अल-बेरूनी यांचे हे वाक्य धड्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अधोरेखित करण्यात आले आहे.
३. मोगलांमुळे भारताचा जगाच्या विविध भागांशी व्यापार वाढला. या काळात इस्लाम धर्माचा भारतात प्रचार झाला. ‘भक्ती’ आणि ‘सुफी’ यांनी देवावरील श्रद्धा अन् मानवावर प्रेम निर्माण करण्याची भावना वृद्धींगत केली.
४. पाठ्यपुस्तकात धडा क्रमांक ५ हा ‘महान मोगल’ (द ग्रेट मुघल) या शीर्षकाखाली आहे – या धड्यात बाबर, अकबर, हुमायूं, आदी ६ मोगल राजांना ‘महान मोगल’ (द ग्रेट मुघल), असे संबोधण्यात आले आहे. यामध्ये या मोगल राजांनी लढलेल्या लढाया, त्यांची वैशिष्ट्ये आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|