२ महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्‍या वडगाव शेरी(पुणे) येथील महिला आंदोलनावर ठाम !

वडगाव शेरी – गेल्या २ महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्‍या वडगाव शेरी येथील सोमनाथनगर भागातील पाणी प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. बेमुदत धरणे आंदोलन करणार्‍या आंदोलनकर्त्यांची पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी भेट घेऊन आश्वासने दिली; मात्र ‘आश्वासने नको, पाणी द्या’, असे म्हणत पुरेसे पाणी मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका महिलांनी घोषित केली.

येथील महिलांनी महिनाभरापूर्वी पुणे महानगरपालिकेत जाऊन पाणीपुरवठा प्रमुखांसमोर समस्या मांडली होती; मात्र तरीही पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा झाली नाही. कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी सांगितले की, या भागातील पाणीटंचाईची कारणे आम्ही शोधत आहोत. पाण्याच्या टाकीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. शिवाय या भागातील जलवाहिन्या ३० वर्षे जुन्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. (हे यापूर्वीच का केले नाही ? जनतेला आंदोलन करण्यास भाग का पाडले ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पाण्यासारखी जीवनावश्यक सुविधा मिळण्यासाठी महिलांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • असे प्रशासन जनतेचे हित साधणारे आहे, असे कोण म्हणणार ?