दांडेकर पूल येथील जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय !

पुणे – सदाशिव पेठ, शिवाजीनगर या भागामध्ये पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी दांडेकर पूल येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. दांडेकर पूल येथून स्वारगेटकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास ही जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता उखडला गेल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वेगाने वहाणारे हे पाणी दांडेकर पूल येथील वस्तीमध्येही शिरले. २ दिवसांपूर्वी या भागात दुसरी एक जलवाहिनी फुटली होती. तिच्या दुरुस्तीचे काम चालू असतांनाच ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याने पर्वती जलकेंद्रातून पाणी बंद केले गेले. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी जलवाहिनी फुटली होती. पाण्याचा दाब योग्य असून जलवाहिनी का फुटत आहे ? याचा शोध घेतला जाईल. सदाशिव पेठ शिवाजीनगर भागातील पाणीपुरवठा यामुळे विस्कळीत होणार आहे. युद्ध पातळीवर काम करून जलवाहिनी दुरुस्तीचे काम चालू आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

ऐन उन्हाळ्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले याचे दायित्व कोण घेणार ?