काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता, स्त्रिया यांच्या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून दिल्यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे. हिंदु जागरणाच्या कार्यात सहभागी कार्यकर्त्यांना त्यामुळे प्रश्न पडायचा की, हिंदु कधी जागे होणार ? ते जागे होणार कि नाहीत ? संतांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करणार्यांना मात्र ‘सातत्यपूर्ण आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास एक ना एक दिवस हिंदु जनमानस जागृत होणार’, याची निश्चिती होती. तोच काळ आणि स्थिती आता येऊ लागली आहे. त्यापैकी काही पैलूंवर येथे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील काळात यापेक्षाही हिंदूंचे भव्य संघटन होऊ शकणार आहे.
१. हिंदूंचे भव्य मोर्चे निघणे
श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीची आफताब पुनावाला या धर्मांधाकडून नृशंस हत्या झाल्यानंतर लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये हिंदूंचे उत्स्फूर्त अन् भव्य जनआक्रोश मोर्चे निघाले. या मोर्च्यांना सहस्रो हिंदूंची उपस्थिती होती. आतापर्यंत हिंदु म्हणून घेणार्या जन्महिंदूंचे मोर्चे निघाले, ते आरक्षण किंवा एखाद्या समाजाच्या मागण्या यांसाठी होते. हिंदु मुलींच्या म्हणजेच हिंदु स्त्रिया आणि संस्कृती यांच्या रक्षणाच्या कार्यासाठी एवढे भव्य मोर्चे निघण्याची ही पहिलीच वेळ ! काही सहस्र हिंदूंना का असेना, त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव होत आहे, हेही नसे थोडके !
सातारा आणि सांगली येथे लव्ह जिहादची घटना उघडकीस आल्यावर तेथील हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येत प्रथम पोलीस ठाण्याला निवेदन दिले अन् लगोलग मोर्च्याचे आयोजन केले. या मोर्च्यांनाही सहस्रो हिंदूंची उपस्थिती लाभत आहे.
२. हिंदुत्वनिष्ठांना जनाधार मिळणे !
पूर्वी हिंदुत्वनिष्ठ म्हणजे काही मोजक्या संघटना आणि त्यांचे कार्य काही ठिकाणी तोडफोड, तर काही ठिकाणी हाणामारी करून निषेध व्यक्त करणे किंवा प्रत्त्युत्तर देणे एवढ्यापुरते मर्यादित होते. परिणामी शेष मोठ्या हिंदु जनसमुहाला त्यांच्याशी काही देणे-घेणे आहे, संबंध आहे, असे वाटत नव्हते. हिंदु जनता त्यांच्यापासून स्वत:ला वेगळेच ठेवत असे. तसेच काही निवडक हिंदुत्वनिष्ठांच्या आततायी कृतीमुळे मोठ्या हिंदु समुहाला नावे मात्र ठेवली जात होती. आता हिंदुत्वनिष्ठांच्या सनदशीर मार्गाने आणि नियोजनबद्ध केलेल्या प्रयत्नांमुळे, तसेच काळही अनुकूल झाल्याने जनाधार मिळण्यास प्रारंभ झाला आहे.
३. ‘लव्ह जिहाद’चा कायदा करण्याची मागणी !
हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांच्या विषयांमध्ये कुणी गोवंशियांच्या हत्या रोखणे, एखाद्या ठिकाणी हिंदूवर झालेला अन्याय रोखणे, धर्मांतर रोखण्यासाठी कुठे प्रयत्न करणे असे विविध स्वरूपाचे विषय होते. गेल्या काही मासांत लव्ह जिहाद कायद्याचीच मागणी सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून केली जात आहे. परिणामी हा विषय लोकप्रतिनिधींकडून गांभीर्याने घेतला गेला आहे.
४. शासनाकडून हिंदुत्वनिष्ठांच्या विषयांना त्वरित प्रतिसाद !
गड-दुर्ग रक्षणासाठी हिंदु जनजागृती समिती गत ७ वर्षांपासून अभियान राबवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक गड-दुर्गांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तर काही गड-दुर्गांवर मजारी, थडगी उभारीपर्यंत धर्मांधांची मजल गेली आहे. समितीच्या निवेदनानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘गडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी’, असे प्रशासनाला आदेश दिले. ३ मार्च या दिवशी ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य महामोर्च्यानंतर पर्यटनमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सर्व गड-दुर्ग यांच्यावरील अतिक्रमणे हटवून संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले. जळगाव जिल्हाधिकार्यांनी पेशवेकालीन पारोळा गडाच्या संवर्धनासाठी बैठक घेऊन गडाचे पावित्र्य भंग करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले.
प्रतापगडावरील अफझलखानाच्या थडग्याभोवती केलेले अवैध बांधकाम तात्काळ पाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड युद्धात केलेल्या पराक्रमाचे एक शिल्प बनवावे, या मागणीचे निवेदन समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. गेली अनेक वर्षे न्यायालयाने आदेश देऊनही अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडले गेले नाही; मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेला विषय पूर्ण करत अफझलखानाच्या कबरीजवळ झालेले अनधिकृत बांधकाम अफझलखानाचा वधाच्या म्हणजेच ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने पाडले.
यंदाच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, आैंढा नागनाथ, वैजनाथ ही ज्योतिर्लिंगे आणि प्राचीन मंदिरांचे जतन अन् संवर्धन यांसाठी भरीव तरतूद केली असून संतांच्या समाध्या, तसेच तीर्थक्षेत्रे यांसाठी मोठी तरतूद केली आहे.
५. हिंदुत्वाच्या विषयांना प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्धी !
एरव्ही हिंदूंच्या हिंदुत्वरक्षणाच्या आंदोलनांना प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित प्रसिद्धी दिली जात नव्हती. प्रसारमाध्यमे त्यांकडे दुर्लक्षच करायची; मात्र हिंदूंचे मोर्च, आंदोलने यांना आता सर्वसामान्य हिंदूंचा एवढा प्रतिसाद मिळत आहे की, प्रसारमाध्यमांना बातम्या दाखवाव्याच लागतात. अन्यथा ‘हिंदुविरोधी’ वाहिनी म्हणून ठपका बसण्याचा धोका आहेच. मध्यंतरी कोल्हापूर येथे हिंदूंचे वारंवार होणारे भव्य संघटन पाहून कोल्हापूरची ‘पुरोगामी’ ओळख पुसली जात नाही का ?, असे सर्व्हेक्षण एका प्रसिद्ध वाहिनीने घेतल्यावर लोकांनी ‘कोल्हापूरची ‘हिंदुत्वनिष्ठ’ अशीच ओळख हवी, पुरोगामी म्हणून नको’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदु राष्ट्राविषयी वक्तव्ये केली, तेव्हा त्यांना सर्वच माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली.
६. हिंदूंसाठी अनुकूल काळ आला आहे !
जन्महिंदूंची संख्या अधिक होती आणि कृतीप्रवण हिंदू मोजकेच होते. जन्महिंदूंपैकी काहींना हिंदुत्वाचे रक्षण करण्याचे महत्त्व पटल्याने ते कृतीप्रवण झाले. म्हणजेच हिंदूंचे वैचारिक परिवर्तन होत आहे. दुसर्या भाषेत सांगायचे झाल्यास हिंदूंची वैचारिक शुद्धी होत आहे. हिंदु श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या विरोधात २० वर्षांपूर्वी तुरळक आवाज उठवला जायचा. आता सामाजिक माध्यमांतून धर्मावरील प्रत्येक आघाताविरुद्ध बुलंद आवाज उठवला जातो आणि हिंदु रस्त्यावरही उतरत आहेत. हिंदूंसाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल काळ जवळ येत असल्याचे हे लक्षण आहे, तसेच हिंदु विरोधकांचे पितळ उघडे पडत आहे. महाराष्ट्रातील एका नेत्याने ‘आता मोदी यांना हरवण्यासाठी प्रत्येक मुसलमानाला मतदानाला बोलवा. मृतांचेही मतदान घ्या’, असे धक्कादायक वक्तव्य केलेे. एका नेत्यावर असे सांगण्याची वेळ येते म्हणजे हिंदुजागृतीची धग त्यांना जाणवू लागली आहे. जागृत, तसेच भविष्यात कृतीशील होणार्या हिंदूंनी या हिंदु नववर्षाच्या निमित्ताने काळाची पावले ओळखून तन-मन-धनाने हिंदुहितरक्षणार्थ आणि हिंदु राष्ट्र निर्मिती यांसाठी समर्पित होण्याचा निश्चय करूनच आपापल्या ठिकाणी विजयी गुढ्या उभाराव्यात !
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.३.२०२३)
हिंदु राष्ट्राच्या मागणीला जोर !उत्तरप्रदेशात ठिकठिकाणी ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा’, अशी भित्तीपत्रके लागली आहेत. संत, कथावाचक, कीर्तनकार हिंदु राष्ट्राची मागणी त्यांचे मार्गदर्शन, प्रवचने यांतून करत शासनाला आवाहन करत आहे. हिंदूंच्या मोर्च्यांमधून हिंदु राष्ट्राचा जयजयकार केला जात आहे. हिंदु तरुण हिंदु राष्ट्राच्या ‘पोस्ट’ सिद्ध करून पाठवत आहेत. सामाजिक माध्यमांमध्ये हिंदु राष्ट्राच्या चर्चा चालू झाल्या आहेत. – श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. |