हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

छत्रपती शिवाजी महाराज म्‍हणजे हिंदूंसाठी अस्‍मिता, स्‍वाभिमान आणि प्रेरणा आहेत. गडदुर्ग हे हिंदूंचे शक्‍तीस्रोत आहेत. एकेकाळी मराठ्यांच्‍या तलवारी मोगलांची चाकरी करत होत्‍या; मात्र छत्रपती शिवरायांनी त्‍यांचा स्‍वाभिमान जागृत केल्‍यानंतर याच तलवारींनी मोगलांना पाणी पाजले. ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणेने धर्माभिमानी हिंदूंचे रक्‍त सळसळल्‍याविना रहात नाही. या एका जयघोषाने धर्मांधांना चोख उत्तर द्यायला हिंदू सिद्ध होतात.

आज शिवराय नसले, तरी त्‍यांच्‍या शौर्याचा इतिहास गडदुर्गांच्‍या रूपात आजही हिंदूंना प्रेरणा देत आहे. हिंदूंना त्‍यांच्‍या पराक्रमाची आठवण करून देत आहे. ‘सर्वधर्मसमभाव’, ‘धर्मनिरपेक्षता’ आदी शब्‍दप्रयोगांनी हिंदूंना पद्धतशीरपणे हिंदुत्‍वापासून तोडण्‍याचा प्रयत्न होत असला, तरी छत्रपती शिवरायांच्‍या जयघोषाने हिंदूंचा स्‍वाभिमान जागृत होतो. ‘शिवराय हेच हिंदूंच्‍या शौर्याचे बीज आहे’, हे आता धर्मांध आणि पुरोगामी मंडळींनी हेरले आहे. त्‍यामुळे गेल्‍या काही वर्षांपासून छत्रपती शिवरायांनाच धर्मनिरपेक्ष ठरवण्‍याचा कावा चालू करण्‍यात आला आहे.

शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्‍यात हिंदुत्‍वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्‍या या शक्‍तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्‍यंत्र आहे. शिवरायांना इस्‍लामप्रिय दाखवण्‍याचेही त्‍यांचे षड्‍यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्‍यासाठी संघटित व्‍हा !

(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)