छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाववाले नव्हते, तर त्यांना हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणायची होती ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची स्पष्टोक्ती !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी (डावीकडे) आणि श्री. अविनाश सावंत

सांगली – छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाववाले नव्हते. त्यांनी हिंदवी धर्माच्या रक्षणासाठी लढा दिला, हा इतिहास आहे. आजचा इतिहास राजकारणासाठी मोडतोड करून सांगितला जात आहे. काही भाडोत्री संशोधकांकडून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गलबला निर्माण केला जात आहे. हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणायची हा ध्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, अशी परखड स्पष्टोक्ती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी व्यक्त येथे केली. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी धारकरी श्री. अविनाश सावंत उपस्थित होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले की, आज विधानसभेत जो राजकीय धुडगूस चालू आहे, तो शोभणारा नाही. सामान्यांचे प्रश्न सोडून जे धुडगूस घालत आहेत ते सारे देशविरोधी आहेत. एकीकडे ‘डान्सबार’वर बंदी घालायची, दुसरीकडे कुणाला कामरासारख्या प्रकरणावरून सभागृहात दंगा करायचा ! हे अयोग्य आहे.

वाघ्या कुत्र्याने छत्रपतींच्या चितेत उडी घेतली हा सत्य इतिहास !

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांनी जे वक्तव्य केले, ते पूर्णपणे चुकीचे आहे. समाजात इतिहासाची मोडतोड करणारे काही इतिहास संशोधक निर्माण झाले आहेत. यातून हा अपसमज परसवला जात आहे. वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चितेत उडी घेतली, हा सत्य इतिहास आहे, असे मत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची जी भूमिका घेतली आहे. ती पुर्णपणे चुकीची आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली, हा इतिहास मी वाचला आहे. त्यामुळे स्मारक म्हणून उभे असेल, तर ते चुकीचे कसे ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने २९ मार्चला मूकपदयात्रा !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासानिमित्त २९ मार्च या दिवशी  मूकपदयात्रा निघणार आहे. मारुति चौकातून निघणारी ही मूकपदयात्रा शिवतीर्थ, महापालिका, राजवाडा, स्टेशन चौक, बदाम चौक, खणभाग, पंचमुखी मारुति रोड, रिसाला रस्त्यावरून परत शिवतीर्थावर त्याची समाप्ती होईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून निघणार्‍या मूकपदयात्रेत सहभागी होऊन आणि संपूर्ण दिवस उपवास करून सर्वांनी धर्मवीर छत्रपति संभाजी महाराजांना श्रद्धांजली वहावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.