राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) येथे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना !

तालुका बंदची चेतावणी, मनमाड महामार्ग शिवप्रेमींनी रोखला !

राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) – राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात ‘बुवासिंद बाबा तालीम संघ’ येथे श्री हनुमानाची मूर्ती आहे. त्याशेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे. २६ मार्चला अज्ञात व्यक्तीने तालमीत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली. थोडया वेळाने काही तरुण तालमीत आले असता, त्यांना पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात आले. याचे तीव्र पडसाद उमटले असून सहस्रो शिवप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरले. उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. मनमाड महामार्ग रोखण्यात आला. व्यापार्‍यांनी तात्काळ दुकाने बंद केली. संतप्त शिवप्रेमी जनतेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी राहुरी नगर परिषदेतील लिपिक हरिश्चंद्र बिवाल यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दिली आहे. शहरात तणावाचे वातावरण असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध चालू आहे. रावसाहेब चाचा तनतुरे, हर्ष तनपुरे, अमोल भनगडे, नंदू तनपुरे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

बेमुदत बंदची चेतावणी !

पोलिसांनी माथेफिरू आरोपीला तातडीने अटक करावी; अन्यथा राहुरी तालुका बेमुदत बंद ठेवण्यात येईल, अशी चेतावणी शिवप्रेमी जनतेने दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ? – संपादक)

मुख्यमंत्र्यांकडून घटनेची नोंद

या घटनेनंतर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचा आदेश दिला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. सध्या राहुरी तालुक्यातील गावे आणि राहुरी, तसेच गुहा गाव बंद ठेवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्या पुतळ्याची विटंबना होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !