मुख्यमंत्र्यांनी सौ. रूपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र घ्यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

पंढरपूर, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – पू. भिडेगुरुजी यांना नाहक त्रास देण्याच्या हेतूने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा सौ. रूपाली चाकणकर गैरवापर करून प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तात्काळ त्यागपत्र घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सौ. रूपाली चाकणकर

या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून महाराष्ट्रात असंख्य माता-भगिनी दहशतीच्या वातावरणात वावरत आहेत. याविषयी महिला आयोग मूग गिळून गप्प बसले आहे. हिंदु पत्रकार महिलेला भारतमातेच्या रूपात पाहून तिला कुंकू लावण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी देतात. याची पोटदुखी मात्र महिला आयोगाला होते, हे संत आणि शूरभूमी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे समस्त माता-भगिनींना आधार वाटेल अशा हिंदुत्वनिष्ठ, धर्मनिष्ठ, धर्माचरणी आणि सत्त्वशील महिलेची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी.