रथोत्सव पूर्ण झाल्यानंतर सप्तर्षींच्या प्रीतीमय वाणीतून उलगडलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची महती !

‘सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे तिथी वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव ‘रथोत्सव’ स्वरूपात साजरा करण्यात आला. रथोत्सव पूर्ण झाल्यावर संध्याकाळी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी भ्रमणध्वनीवरून नाडीवाचन केले. त्या वेळी ‘सप्तर्षींच्या वाणीतून गुरुदेवांच्या रथोत्सवाच्या वेळी स्थूल आणि सूक्ष्मातून काय काय घडले ?’, हे त्यांनी सांगितले. यासाठी सप्तर्षींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


रात्रभर झालेल्या पावसाने दाट धुके पडलेले असूनही २२ मे या दिवशी झालेला मनोहारी सूर्याेदय

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथ बाहेर पडताक्षणी पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रांतील चैतन्याला जागृती मिळाली !

श्रीमन्नारायणाचे अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा (गुरुदेवांचा) रथ ज्या क्षणी आश्रमातून बाहेर पडला, त्या क्षणी पृथ्वीवरील सर्व जागृत मंदिरे, तीर्थक्षेत्रे, ५१ शक्तिपिठे, १२ ज्योतिर्लिंगे यांमधील चैतन्याला नवजागृती मिळाली.

२. निसर्गच तिन्ही अवतारी गुरूंची महती सांगणार आहे !

पंचमहाभूतांमधील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश एक एक करून रथारूढ परात्पर गुरुदेवांना नमस्कार करून गेले. निसर्गाला आज पुष्कळ आनंद झाला होता. ‘आनंद गगनात मावेना’, अशी निसर्गाची स्थिती झाली होती. कलियुगात श्रीमन्नारायण पृथ्वीवर परात्पर गुरु डॉ. आठवले या रूपात आले आहेत. हे सांगण्याचे कार्य सप्तर्षींनी निसर्गाला दिले आहे. निसर्गच येणाऱ्या काळात अवतारी गुरूंची महती सर्वांना सांगणार आहे.

३. सूर्यनारायणाने सर्व साधकांना भरभरून आशीर्वाद दिला !

रथोत्सवाच्या आदल्या दिवशीच्या तुलनेत आजचे, म्हणजे २२.५.२०२२ या दिवशीचे वातावरण पूर्णपणे विरुद्ध होते. आज रथोत्सवाच्या दिवशी सूर्यनारायणाने सर्व साधकांना भरभरून आशीर्वाद दिला.

(‘रथोत्सवाच्या आदल्या दिवशी सतत पाऊस पडत होता आणि ढग पुष्कळ खाली आले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. सप्तर्षी आणि गुरुदेव यांच्या कृपेने २२.५.२०२२ या दिवशी सकाळी ६ नंतर सूर्यकिरण दिसले आणि आकाश निरभ्र होते. सर्व साधकांनी ‘ही श्रीमन्नारायणाची लीलाच होती’, हे अनुभवले.’ – संकलक)

४. ‘सनातनचे ३ गुरु हे अवतार असून या तीनही गुरूंना आशीर्वाद देण्यासाठी स्वयं निसर्ग येतो, यापेक्षा मोठी प्रचीती ती कोणती ?’, असे सप्तर्षींनी सांगणे !

काल रात्रीपर्यंत आकाशात काळे ढग होते आणि रथोत्सवाच्या दिवशी आकाशात एकही ढग नव्हता. ‘सनातनचे तीनही गुरु अवतार आहेत’, हे मनुष्याला कळो ना कळो; मात्र निसर्गाला हे कळले आहे.’ त्यामुळेच निसर्गाने कृपा केली. ही त्याने दिलेली अवतारी प्रचीतीच आहे. ‘तीनही गुरूंना आशीर्वाद देण्यासाठी स्वयं निसर्ग आला होता, यापेक्षा मोठी प्रचीती ती कोणती ?’ रथोत्सव संपल्यावर आश्रमातील साधक कृतज्ञतेने बोलत होते की, ‘परात्पर गुरुदेव रथातून उतरून खोलीत गेल्यावरच पाऊस आला.’ या अनुभूतीनंतर आश्रमातील सर्व जण ‘निसर्ग’ आणि ‘नारायण’ यांविषयीच बोलत आहेत.

(‘हो. बरोबर आहे. गुरुदेव खोलीत जाईपर्यंत आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडला नाही. गुरुदेव खोलीत गेल्यावर लगेच पाऊस आला. या संदर्भात अनेक साधक एकमेकांशी चर्चा करत होते. सर्व साधकांना श्रीमन्नारायणरूपी गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.’ – संकलक)

५. जेथे श्रीकृष्ण आहे, तेथेच गरुड येतो !

रथोत्सवाच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही गरुड आला होता. (‘रथोत्सवाच्या वेळी अनेक वेळा गरुड रथयात्रेच्या जवळ आला होता.’ – संकलक) जेथे श्रीकृष्ण आहे, तेथेच गरुड येतो. यावरून ‘गुरुदेवांमध्ये श्रीकृष्णाचे तत्त्व आहे’, यात कोणताही संशय नाही ! (रथोत्सवाच्या आदल्या दिवसापासून रामनाथी आश्रमावर २ – ३ गरुड घिरट्या घालत होते. आदल्या दिवशी संध्याकाळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलत असतांना काही कारणास्तव मी खोलीच्या आगाशीमध्ये आलो. त्या वेळी एक ७ – ८ फूट रुंद (‘सामान्य गरुड २ – ३ फूट रुंद असतो.’ – संकलक) असणारा गरुड माझ्या अगदी जवळ येऊन गेला. वर्ष २०१५ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या हिमाचल प्रदेश दौऱ्यात आम्हाला अशाच गरुडाचे दर्शन झाले होते. हे सर्व महर्षींना कळवल्यावर ते म्हणाले, ‘वर्ष २०१५ मध्ये आलेला देवाचा गरुडच आज रामनाथी आश्रमाच्या जवळ आला आहे.’ – श्री. विनायक शानभाग)

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अवतारी कार्य !

अवतारी गुरुदेवांचे उत्तराधिकारीही अवतारी आहेत. येणाऱ्या काळात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे अवतारी कार्य साधकांच्याही लक्षात येईल. गुरुदेवांचे दोन डोळे म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ ! आश्रम आणि सर्वत्रच्या साधकांच्या आध्यात्मिक पालनपोषणाचे कार्य श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून होणार आहे. पृथ्वीवर सर्वत्र जाऊन गुरुदेवांची कीर्ती करणे, हे कार्य श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आहे. या दोघीही पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) अनेक साधकांना संतपदापर्यंत नेणार आहेत.

७. सप्तर्षींची श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !

‘हे श्रीमन्नारायणा, संपूर्ण पृथ्वीवरील कोट्यानकोटी जिवांमध्ये तुमची कीर्ती करू शकतात, असे दोन जीव असून त्यांचे नाव आहे ‘श्रीसत्‌शक्ति’ आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति’. गुरुदेवांची कीर्ती संपूर्ण विश्वात करण्यासाठी साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात आणि साक्षात् श्री सरस्वतीदेवी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपात पृथ्वीवर आल्या आहेत. ‘श्रीसत्‌शक्ति’ आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति’ गुरुदेवांची कीर्ती युगानुयुगे टिकून राहील’, असे करतील, हे सप्तर्षींचे सत्यवचन आहे ! ‘अवतार असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंनी ‘सप्त-ऋषींना’ त्यांच्या छत्रछायेत घ्यावे’, अशी आम्ही तीन गुरूंना प्रार्थना करतो.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, २२.५.२०२२, रात्री ८ वाजता)

८. ‘सनातनच्या तिन्ही गुरूंनी ‘सप्त-ऋषींना’ छत्रछायेत घ्यावे’, असे सप्तर्षींनी म्हणण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले : सप्तर्षींच्या सत्यवचनाचे नाडीवाचन पू. डॉ. ॐ उलगनाथन् करतात. ते नाडीवाचनात सांगतात, तसे सनातनचे तिन्ही गुरु करतात. ‘अवतार असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंनी ‘सप्त-ऋषींना त्यांच्या छत्रछायेत घ्यावे’, असे नाडीवाचनात पू. डॉ. ॐ उलगनाथन् कसे म्हणतात ?

सप्तर्षी : ‘सप्तर्षींना हे सत्यवचन लिहायला सांगणारे श्रीमन्नारायणच आहेत. श्रीमन्नारायणाने जे लिहायला सांगितले, ते आम्ही लिहिले. सप्तर्षींनी लिहिलेले ‘सत्य’ करवून दाखवणारे, म्हणजे आम्ही लिहिल्याप्रमाणे कृती करणारेही श्रीमन्नारायणच आहेत. श्रीमन्नारायणाचे हृदय हेच आम्हा सप्तर्षींचे स्थान आहे. प्रत्येक युगात श्रीदेवी आणि भूदेवी यांच्यासहित श्रीमन्नारायणाचा अवतार होतो. तेव्हा आम्ही सप्तर्षी श्रीमन्नारायणाला प्रार्थना करतो की, देवाने आम्हाला नेहमी त्याच्या हृदयातच ठेवून घ्यावे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन्नारायणाचे अवतार आहेत, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या अनुक्रमे ‘भूदेवी’ आणि ‘श्रीदेवी’च्या अवतार आहेत; म्हणून आम्ही सप्त-ऋषींनी ‘सनातनच्या तिन्ही गुरूंच्या छत्रछायेत, म्हणजे आम्हाला तिन्ही गुरूंच्या हृदयात ठेवून घ्यावे’, अशी प्रार्थना केली.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथनजी  यांच्या माध्यमातून, २४.०५.२०२२, दुपारी १.३५)

रथोत्सवात नृत्यसेवा सादर करणाऱ्या साधिका  कु. शर्वरी कानस्कर आणि  कु. अपाला औंधकर यांच्या अगदी जवळून जातांना एक वासरू

साधकांच्या डोळ्यांतून पडणारे भावाश्रू म्हणजे ‘भावाचे मोतीच’ होते !

गुरुदेवांचा रथोत्सव पाहून भाव दाटून आलेले साधक

रामनाथी आश्रमातून श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा रथ पुढे जाऊ लागल्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या साधकांना कळेना की, आपण पृथ्वीवर आहोत कि देवलोकात ? रथारूढ असलेल्या गुरुदेवांकडे पहाणाऱ्या साधकांच्या डोळ्यांतून बाहेर पडणारे एक एक भावाश्रू म्हणजे ‘भावाचे मोतीच’ होते. ‘साक्षात् ईश्वराने दर्शन दिल्यावर जसा भक्त भान हरपतो’, तशी साधकांची स्थिती झाली होती.


पशू-पक्षी, निसर्ग आणि पंचमहाभूते यांना पुष्कळ आनंद झाला होता !

रथोत्सवाच्या वेळी आकाशात दिसलेले गरुड

रथोत्सवाच्या वेळी पक्ष्यांच्या रूपात ऋषिमुनी आले होते. पक्षी, निसर्ग आणि पंचमहाभूते यांना पुष्कळ आनंद झाला होता. भगवंत आज पक्षी आणि गरुड यांच्या रूपात आला होता. (‘अनेक ठिकाणी रथाच्या समोरून पक्ष्यांचे थवे जात होते.’ – संकलक) परात्पर गुरु डॉ. आठवले रथावर बसल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. (‘हो. साधकांनी याची अनुभूती घेतली.’ – संकलक)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर उच्च कोटीची श्रद्धा असणारे पू. डॉ. ॐ उलगनाथनजी !

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी (गुरुदेवांविषयी) नाडीपट्टी लिहिणारे सप्तर्षी आहेत. मी केवळ नाडीपट्टी वाचणारा असून एक माध्यम आहे. सप्तर्षींनी नाडीपट्टीवर लिहिल्याप्रमाणे सर्व करवून घेणारे गुरुदेव हेच श्रीमन्नारायण आहेत.’

– पू. डॉ. ॐ उलगनाथन्, (२२.५.२०२२, रात्री ८)


परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी महर्षींचा नमस्कार !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् भगवंत आहेत’, या भावाने साधकांनी प्रत्येक सेवा त्यांच्या चरणी अर्पण करावी. सनातन संस्थेला आज या उच्चतम शिखरावर पोचवण्यासाठी गुरुदेवांनी किती कष्ट घेतले आहेत ! साधकांना अनेक प्रकारे त्रास होत असूनही सर्व संकटांवर मात करून सनातन संस्था आज उभी आहे; याचे कारण म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ होय ! त्यांना आम्ही महर्षि साष्टांग नमस्कार करतो ! – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीवाचन क्र. १५३, १४.१०.२०२०)

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून, २४.५.२०२२, दुपारी १.३५)

  • परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले,  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे भगवंताचे अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक