महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कक्षाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वैज्ञानिक परिभाषेत धर्माचरणाची माहिती देणारा हा कक्ष जिज्ञासूंच्या मनावर आचारधर्माचे महत्त्व अंकित करणारा ठरला. या कक्षात जिज्ञासूंना संशोधन करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि प्रयोगांचे निष्कर्ष यांची माहिती देण्यात आली. ‘मेणबत्ती आणि तुपाचा दिवा या दोन्हींकडे पाहून काय वाटते ?’, हा प्रयोग सर्व जिज्ञासूंनी केला. त्यातील बहुतांश जिज्ञासूंना सात्त्विक तुपाच्या दिव्याकडे पाहून अनेक चांगल्या अनुभूती आल्या.
कक्षाला भेट देणारे काही जिज्ञासू म्हणाले, ‘‘इतके दिवस दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाची प्रसिद्ध होत असलेली माहिती वाचतो. आज प्रत्यक्ष पाहिल्यावर मनातील शंकांचे निरसन झाले.’’ एका जिज्ञासूने ‘हा संशोधन कक्ष गावागावांत उभारून त्याविषयी माहिती दिली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. संशोधन कार्याची माहिती देत असलेल्या कक्षात अनेकांना सुगंधाची अनुभूती आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने चालू असलेले आध्यात्मिक आणि वैज्ञानिक संशोधनाचे कार्य सर्वच वाचक अन् जिज्ञासू यांना पुष्कळ भावले.