ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धार्मिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !

सिंधुदुर्ग, १५ डिसेंबर (वार्ता.) – सध्या पाश्‍चात्त्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे आपल्या देशातही गुढीपाडव्याऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता नववर्ष साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे. या रात्री युवकांमध्ये मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके फोडून प्रदूषण केले जाते, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावून त्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून नृत्य केले जाते. तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार होऊन एकूणच कायदा अन् सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होते. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबर या दिवशी आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरला रात्री महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे, गड-किल्ले यांसारख्या ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान करणे आणि मेजवान्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा, पोलिसांच्या वतीने गस्तीपथके ठेवणे, अपप्रकार करणारे आणि वेगाने वाहने चालवणारे यांच्यावर त्वरित कारवाई करणे, फटाक्यांतून होणार्‍या प्रदूषणाविषयी जनजागृती करणे, अशा काही उपाययोजना केल्यास या अपप्रकारांना आळा बसेल. या अनुषंगाने जनजागृती करावी आणि योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस, प्रशासन आणि महाविद्यालये येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांना दिलेली निवेदने

निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा सकारात्मक प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी (जिल्हा मुख्यालय) – येथील निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विषय पूर्णपणे ऐकून घेतला. त्यानंतर भडकवाड यांनी ‘त्वरित सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश देतो आणि कारवाई करायला सांगतो’, असे आश्‍वासन दिले. तसेच अपर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी, ‘गड आणि किल्ले येथे पोलीस बंदोबस्त ठेवू’, असे सांगून तालुकास्तरावरील सर्व पोलीस ठाण्यांना त्याप्रमाणे पत्रक काढण्याचे निर्देश दिले आणि ‘वेगाने गाडी चालवणार्‍यांवर कारवाई करू’, असे आश्‍वासन दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

देवगड – येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील आणि पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जामसंडे येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजू पाटील, देवगड येथील शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य पप्पू कदम, भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर, श्री. भास्कर खाडिलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद मोंडकर उपस्थित होते.

मालवण – येथील तहसीलदार अजय पाटणे आणि पोलीस निरीक्षक एस्.एस्. ओटवणेकर यांना, तसेच स.का. पाटील महाविद्यालय, अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल आणि भंडारी हायस्कूल येथे निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मामभिमानी पंकज नेरकर यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते.

कुडाळ – येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे, तहसीलदार अमोल पाठक आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे अधीक्षक एन्.व्ही. भांडारकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. हरिलाल पटेल, श्री. समीर सावंत यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सावंतवाडी – येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांना, तसेच पंचम खेमराज महाविद्यालय, बांदेकर आर्ट कॉलेज, देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि राणी पार्वतीदेवी महाविद्यालय येथे निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता वैभव गावडे यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दोडामार्ग – येथील तहसीलदार नाना देसाई आणि पोलीस ठाणे अंमलदार सौ. पलक गवस यांना निवेदन देण्यात आले. या वेळी उद्योजक श्री. विठ्ठल दळवी, शिवशंभु प्रतिष्ठान दोडामार्गचे श्री. प्रसाद तिळवे, श्री. दीपक गवस यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय

१. श्री. राजू पाटील, अध्यक्ष, जामसंडे व्यापारी संघटना – आजचे हे निवेदन इतर शासकीय कामांपेक्षाही पुष्कळ महत्त्वाचे आहे. त्यामुळे तहसीलदारांना ते लवकरात लवकर देणे आवश्यक आहे. त्यांची भेट होणे पुष्कळ आवश्यक आहे.

२. नीलकंठ बगळे, पोलीस निरीक्षक, देवगड – आज आपल्या तरुणपिढीवर संस्कार पुष्कळ अल्प होत चालले आहेत. तरुणवर्ग अधिकाधिक व्यसनाधीन होत चालला आहे. आज गड-किल्ले यांच्या भिंतीवर चुकीचे शब्द लिहिले जातात. यासाठी आम्ही नक्कीच कार्यवाही करणार आहोत.

३. निवेदन देण्यास प्राधान्य देणारे भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर

भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर हे तहसीलदार कार्यालयात स्वतःच्या कामासाठी आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या हातातील निवेदनाची प्रत त्यांनी वाचून पाहिली आणि ते निवेदन देण्यासाठी सिद्ध झाले. स्वत:च्या कामाऐवजी निवेदन देण्यास प्राधान्य देऊन ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसोबत तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाणे येथे गेले, तसेच निवेदन देण्यासाठी सहकार्य केले.