ट्विटरचे नवयुग !

 संपादकीय

अमेरिकेतील मूळच्या भारतीय उच्चपदस्थ अधिकारांच्या भारताला लाभ न होणे लज्जास्पद !

पराग अग्रवाल

नुकतेच ‘ट्विटर’ या लोकप्रिय सामाजिक माध्यमाचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्से यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. त्यांच्या जागी मूळचे भारतीय असलेले आणि ‘आयआयटी बाँबे’ या जगद्विख्यात महाविद्यालयातून संगणक अभियंत्याचे शिक्षण घेतलेले पराग अग्रवाल यांना दायित्व देण्यात आले आहे. अन्य अनेक सुविधांच्या जोडीला साडेसात कोटी रुपये एवढे वार्षिक वेतन घेणारे अन् केवळ ३७ वर्षीय असलेले अग्रवाल हे जागतिक क्रमवारीत पहिल्या ५०० आस्थापनांपैकी एक असलेल्या ट्विटरचे प्रमुख झाल्याने ‘सर्वांत तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी’ असे म्हटले जात आहे. जागतिक आस्थापनांच्या आणि प्रामुख्याने अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’ येथे असलेल्या तंत्रज्ञानाशी संबंधित आस्थापनांच्या प्रमुखपदी भारतियांचा बोलबाला आहे. ‘गूगल’चे मूळ आस्थापन ‘अल्फाबेट’चे सुंदर पिचई, ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नडेला, ‘आयबीएम्’ आस्थापनाचे अरविंद कृष्णा, ‘अडोब’चे शंतनू नारायण ही भारतीय नावे तंत्रज्ञानाच्या जगतामध्ये महत्त्वपूर्ण मानली जातात. या आधीही ‘सिटी बँक’ या जागतिक अधिकोषाच्या प्रमुखपदी राहिलेले मूळचे पुण्यातील विक्रम पंडित, ‘पेप्सी को’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी, ‘मास्टरकार्ड’ या ‘डिजिटल पेमेंट्स’शी संबंधित आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बांगा या भारतियांची नावे प्रामुख्याने घेता येतील.

कुचकामी शिक्षणव्यवस्था !

ट्विटरच्या पराग अग्रवाल यांच्या उदाहरणामुळे भारतियांची बुद्धीमत्ता आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये ती निभावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका, हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. अर्थात् याचा भारताला प्रत्यक्ष तर नाहीच; परंतु अप्रत्यक्ष लाभही झाल्याचे दिसून आलेले नाही. काही बुद्धीवादी अमेरिकेतील उच्चपदस्थ भारतियांचा भारताला लाभ न होण्यामागे आधुनिक काळातील ‘कॉर्पाेरेट प्रोफेशनलिझम्’ (व्यावसायिकता) या गोंडस संज्ञेचा आधार घेत युक्तीवाद करतात; परंतु ते काही खरे नाही. आहे त्या अधिकारांच्या बळावर मायदेशासाठी निश्चितच काहीतरी चांगले करण्याची संधी आपल्यापाशी असते. येथे जमेची बाजू ही आहे की, असे कुणा भारतीय असलेल्या आस्थापनाच्या प्रमुखाने भारतासाठी केले, तरी या विरोधात कुणी काही बोलण्याचे कारण नाही. आज सर्व धोरणे ही आर्थिक दृष्टीतून आखली जातात. चीननंतर आज भारत हा सर्वांत मोठी बाजारपेठ आणि प्रचंड मनुष्यबळाचा देश म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे भारताचा पक्ष घेत एखाद्या जागतिक आस्थापनाने त्याचा व्यवसाय भारतात वाढवला अथवा भारताच्या हितामध्ये काही निर्णय घेतले, तरी त्याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्या आस्थापनाला होणार आहेच. या जोडीला आज साम्यवादी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी जगात भारत अन् हिंदु धर्म यांच्या विरोधात राजकीय, आर्थिक, वैचारिक, धार्मिक अशा नानाविध स्तरांवर औपचारिक अथवा अनौपचारिकरित्या विद्वेष पसरवत आहेत, हे उघड सत्य आहे. अशा सर्व कुटील प्रयत्नांना हुशारीने दोन हात करून त्यांना नमवण्याचा प्रयत्न करण्याचे पदाचे शस्त्र हातात असतांनाही कुणीच उच्चपदस्थ अधिकारी त्यासाठी काही करत नाही. या शोकांतिकेमागे राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील प्रेमाचा अभाव असणे, हे कारण महत्त्वाचे म्हणता येईल. यामागे जनतेला नैतिकता, धर्म, न्याय आदींचे शिक्षण न देता केवळ भौतिकतावादाची नि पैसे कसे कमावता येतील ? अशा प्रकारच्या मानसिकतेचे बीज रोवणारी आणि केवळ विद्वत्ता अन् त्याच्या उपयोगातून मिळत असलेल्या बौद्धिक सुखापुरती सीमित असलेली कुचकामी शिक्षणव्यवस्था कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायल या इवल्याशा ज्यू देशाचा विचार करता येईल. आज इस्रायलचा धर्म, त्याचे भू-राजकीय महत्त्व आणि अमेरिकेला मध्यपूर्वेमध्ये त्यामुळे होत असलेला लाभ एवढेच नाही, तर अमेरिकी आस्थापनांमध्ये ज्यू लोकांचे असलेले वर्चस्व हे अमेरिकेला इस्रायलला पूरक अशी जागतिक धोरणे आखण्यास भाग पाडते. त्या तुलनेत भारत पुष्कळ मागे आहे, हे कटू सत्य आपल्याला या निमित्ताने स्वीकारावे लागेल.

वैचारिक जडणघडण !

ट्विटरचा विचार करता मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्से हे हिंदुविरोधी आणि भारतद्वेषी मंडळींशी हातमिळवणी करणार्‍यांपैकी एक आहेत. वर्ष २०१८ मध्ये त्यांच्या भारतभेटीत ते वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय, राष्ट्रद्रोही पत्रकार बरखा दत्त यांच्यासमवेत एका व्यासपिठावर होते. यातून त्यांची भारत आणि पर्यायाने हिंदुविरोधी मानसिकता समोर आली होती. हिंदुत्वनिष्ठांच्या ट्विटर खात्यांवर बंदी आणणे, त्यांची खाती ‘शॅडो बॅन’ करणे (खात्यावरून करण्यात आलेल्या ट्वीट्स खात्याच्या अनुयायांपर्यंत पोचू न देणे यांसारखे अलिखित निर्बंध घालणे) यांसारख्या हिंदु विचारांचे खच्चीकरण करण्यामागे अन्य कारणांसमवेत डॉर्से यांची विचारसरणीही कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. याच कालावधीत भारत शासनाला कथित ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’चे डोस पाजणारे ट्विटरच होते. जगातील सर्वांत शक्तीशाली असलेले तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते बंद पाडण्यापर्यंतची यांची मजल गेली होती. आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवनियुक्त प्रमुख झाले असल्याने अनेक भारतियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशातच १० वर्षांपूर्वीची अग्रवाल यांची ट्वीट सध्या प्रसारित होत आहे. यात त्यांनी मुसलमानधार्जिणी भूमिका मांडली होती. एका दशकापूर्वी केलेल्या एका ट्वीटवरून एखाद्याच्या मानसिकतेचा खचितच अंदाज बांधता येईल; परंतु जिहादीप्रेमी आणि साम्यवादी यांच्या वैचारिक आतंकवादास खतपाणी घालण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ट्विटरच्या पराग अग्रवाल यांची वैचारिक जडणघडण ट्विटरच्या पुढील वाटचालीस दिशा देणारी ठरेल, हे निश्चित आहे. शस्त्रापेक्षा अनेक वेळा शास्त्र म्हणजेच विचारांचे युद्ध अधिक प्रभावशाली असतांना ट्विटरचे नवयुग भारताला पूरक होण्यासाठी शेवटी हिंदूसंघटन आणि भारतियांमध्ये वैचारिक क्रांतीची मशाल पेटवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे !