अनेक शतकांनंतरही आद्यशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाशी संबंधित वस्तूंमध्ये चैतन्य टिकून असणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशी म्हणजेच २५.५.२०२१ या दिवशी आद्यशंकराचार्य यांचा कैलासगमन दिवस आहे. त्या निमित्ताने..

आद्यशंकराचार्य
यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३.४.२०२१ या दिवशी वेलियनाड (केरळ) येथील ‘मेलपाळूर मना’ या आद्यशंकराचार्य यांचे जन्मस्थान असलेल्या स्थळाला भेट दिली. (येथे आद्यशंकराचार्य यांच्या आई आर्यम्बा यांचे पिढीजात घर आहे. त्याला ‘मेलपाळूर मना’ असे म्हणतात. या घरात आद्यशंकराचार्य यांचा जन्म झाला होता.) श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘मेलपाळूर मना’ येथे पोचल्या, तेव्हा त्या घराच्या डागडुजीचे काम चालू होते. तेथील व्यवस्थापकांनी सांगितले, ‘‘वर्ष १९८९ मध्ये ‘चिन्मय मिशन’चे संस्थापक पू. चिन्मयानंद यांनी हे घर आद्यशंकराचार्य यांच्या वंशजांकडून विकत घेतले आणि त्याचे जतन केले.’’ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी व्यवस्थापकांना विचारले, ‘‘आद्यशंकराचार्य यांच्या डागडुजी चालू असलेल्या घराच्या नको असलेल्या काही वस्तू (उदा. घराबाहेरील माती, घरातील लाकूड, घराच्या छताची कौले आदी) संशोधनासाठी मिळू शकतील का ?’’ तेव्हा व्यवस्थापकांनी लगेच होकार दिला. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने या वस्तूंचे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. ते पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

वेलियनाड येथील आद्यशंकराचार्यांचे जन्मस्थळ

या चाचणीत आद्यशंकराचार्यांच्या जन्मस्थळाशी संबंधित वस्तूंची (घराबाहेरील माती, घराचे लाकूड, घराच्या छताचे कौल (टीप) आणि तुटलेल्या कौलाचा तुकडा यांची) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

टीप – या कौलावर ‘१८७१’ असे लिहिले होते. यावरून साधारण १५० वर्षांपूर्वी या घराची डागडुजी करण्यात आलेली असावी, असे लक्षात येते.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – आद्यशंकराचार्यांच्या जन्मस्थळाशी संबंधित वस्तूंमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. आद्यशंकराचार्य – हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक ! : ‘वर्ष ७ व्या शतकापूर्वी भारतात काही पंथ नव्याने उदयाला आले अन् त्यांनी वैदिक धर्माशी संघर्ष चालू केला. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात काही पंथांनी वैदिक धर्माला पायदळी तुडवण्याचा आवेशपूर्वक प्रयत्न चालू केला. या पंथांच्या समवेतच देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरत होते. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला आणि तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. त्यामुळे सामान्य मनुष्य गोंधळात पडला होता. खरा धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते. अशा वेळी आद्यशंकराचार्यांचा जन्म केरळ प्रांतातील कालडी या गावी वर्ष ६३२ मध्ये झाला. त्यांचे नाव शंकर होते. संन्यास घेऊन आपले जीवन धर्मकार्यासाठी अर्पण करण्याकरिता त्यांनी लहान वयातच घराचा त्याग केला. गोविंदयतींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना विधिवत् संन्यासदीक्षा दिली आणि त्यांचे ‘शंकराचार्य’ असे नामकरण केले.

प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी त्या पंथांच्या मतांचा पाडाव करून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. शंकराचार्यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले, धर्मातील विकृती दूर केल्या, काळाच्या प्रभावाने धर्मावर वाढलेली जळमटे दूर केली आणि आचारप्रधान अन् अद्वैतप्रधान अशा वैदिक धर्माचा प्रकाश भारतभूमीवर सर्वत्र भरून टाकला. त्यामुळे धर्माला तेज प्राप्त झाले.

आद्यशंकराचार्य हे एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार आणि धर्मसाम्राज्याचे संस्थापक होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे ‘जगद्गुरु’ ठरले.’ (संदर्भ : सनातन संस्थेचे संकेतस्थळ – sanatan.org)

२ आ. आद्यशंकराचार्य यांच्या जन्मस्थळाशी संबंधित वस्तूंमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे : ‘आद्यशंकराचार्य भगवान शिवाचे अवतार होते’, अशी मान्यता आहे. त्यांनी हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे महान कार्य केले. वैदिक हिंदु धर्म पुढेही टिकून रहावा, यासाठी त्यांनी भारताच्या चारही दिशांना चार धर्मपीठे स्थापली. अशा प्रकारे आद्यशंकराचार्य यांची विद्वत्ता आणि त्यांचे महान कार्य यांमुळे ते स्वतः चैतन्याचा स्रोत होते. त्यामुळे त्यांचे जन्मस्थळही साहजिकच चैतन्यमय आहे. त्यांच्या वास्तूमधील चैतन्य त्या वास्तूशी संबंधित वस्तूंमध्येही भरून राहिले आहे. त्यामुळे त्या वस्तूंमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. साडेतेराशे (१,३५०) वर्षे होऊनही या वस्तूंमधील चैतन्य अजूनही टिकून आहे.

३. हिंदु धर्मात संतांचे जन्मस्थान, त्यांची तपोभूमी, त्यांनी स्थापन केलेले मठ, त्यांच्या नित्य वापरांतील वस्तू, त्यांचे समाधीस्थळ आदी जतन करण्याची प्राचीन परंपरा असणे

संत आणि गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असते. त्याचा भक्तगण, साधक अन् शिष्यगण यांना आध्यात्मिक लाभ होतो. त्यामुळे आजच्या विज्ञानयुगातही भक्तगण संतांच्या पादुकांवर शरणागतीने डोके ठेवून नमस्कार करतात. तसेच संतांचे जन्मस्थान, त्यांची तपोभूमी, त्यांनी स्थापन केलेले मठ किंवा आश्रम यांचे भावपूर्ण दर्शन घेतात. संतांनी देहत्याग केल्यानंतरही ते सूक्ष्मातून भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांना आध्यात्मिक अनुभूती देतात. हिंदु धर्मात संतांचे जन्मस्थान, त्यांची तपोभूमी, त्यांनी स्थापन केलेले मठ किंवा आश्रम, त्यांच्या नित्य वापरांतील वस्तू, त्यांचे समाधीस्थळ आदींमध्ये पुष्कळ सात्त्विकता असल्याने ते जतन करण्याची प्राचीन परंपरा आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.५.२०२१)

ई-मेल : [email protected]

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक