बंगाल निवडणुकीचे युद्ध !

बंगालमधील विधानसभा निवडणुका एकूण ८ टप्प्यांत होत असून त्यातील २२, २६ आणि २९ एप्रिल या ३ दिवसांचे मतदान बाकी आहे. येथील निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारशाही ओतप्रोत भरून वहात आहे की, ‘ही लोकशाही आहे का ?’, असा प्रश्‍न कुणालाही पडावा. ही अधिकारशाही लोकशाहीला लागलेला कलंक आहे. येथील ठोकशाहीमुळे सामान्य जनतेचा आणि या देशाच्या युवा पिढीचा लोकशाहीवरील विश्‍वास उडाला, तर त्यांना दोष देता येणार नाही.

ममतांची कुरघोडी

बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आक्षेपार्ह भाषणांमुळे त्यांना १ दिवस प्रचारबंदी करण्यात आली. नेहमीप्रमाणेच त्यांनी याही वेळी मुसलमानांना थेट आवाहन केले. त्यापूर्वीही त्यांच्या अनेक भाषणांसाठी निवडणूक आयोगाने आक्षेप घेऊन त्यांना चेतावणी दिली, तसेच नोटिसा दिल्या होत्या. ‘निवडणूक आयोगाचे नाव ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ ठेवा’, असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर वरील कारवाई करण्यात आली; पण त्याला जुमानतील, त्या ममता बॅनर्जी कसल्या ? अखेरीस ‘केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात लोकांना भडकावू नका, हवे तर मला शिव्या द्या’, असे प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या बर्धमान येथील भाषणात त्यांना दिले. १० एप्रिलला कोलकात्यातील एका मतदान केंद्रावर झालेल्या वादावादीत सैनिकांना गोळीबार करावा लागला आणि त्यात ६ जण गेले. त्यातील एक मतदान करायला आलेला सामान्य युवक होता. खुद्द ममतादीदींचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात गोंधळ झाला. बूथवर सैनिकांनी मतदारांना मारहाण करण्याची घटना घडली. ‘भाजप मतदान केंद्रांवर नियंत्रण मिळवून काही ना काही गडबड करत आहे’, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. येथील मतदारसंघात ममतादीदी गेल्या आणि दोन्हीकडील उमेदवारांनी मोठा गोंधळ घातला.

ममता बॅनर्जी

दुसरीकडे ममतांनी देशभरातील १५ पक्षप्रमुखांना भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकांमध्येही असा प्रकार करून त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले होते. यापूर्वी डाव्यांशी लढून निवडून आलेल्या ममतादीदी आता हिंदुत्वनिष्ठ पक्षाशी लढत आहेत. ‘देशात या दोन विचारांमध्येच जनता विभागली गेली असतांना ममता यांची तिसरी विचारधारा आहे का ?’, असा कुणाला प्रश्‍न पडेल. अर्थातच ती आहे, ‘स्वार्थी आणि सत्तालोभी राजकारण्यांची !’ त्यामुळे जरी त्या ही निवडणूक हरल्या, तरी पुढे देशाच्या राजकारणात स्थान मिळवण्याचे त्यांचे हेतू लपून रहाणार नाहीत.

सत्तापालट हवा !

भाजपने मात्र बंगालमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी जिवाची बाजी लावली आहे. तेथील तृणमूल काँग्रेस पक्षाने फोफावून दिलेले हिंदुद्वेषाचे अराजक पहाता, ते फार काही चुकीचे म्हणता येणार नाही. बंगालमध्ये ज्या प्रमाणात आज हिंदूंच्या हत्या होत आहेत, त्या कल्पनेपलीकडील आहेत. बंगालमधील धर्मांधांच्या उद्दामपणामुळे पसरलेला हिंदुद्वेष पराकोटीला गेला आहे. भाजपचे राज्य आलेच, तर दीदींच्या गेल्या १० वर्षांच्या अतिरेकी अनभिषिक्त साम्राज्याला तडा जाऊन प्रथमच हिंदुत्वनिष्ठ सरकार तिथे येईल. ममतादीदींनी त्यांच्या काळात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचा प्रचंड अतिरेक करून हिंदूंवर जो अन्याय केला, त्या हिंदुद्वेषी कृत्यांची सूची न संपणारी आहे.

नवरात्रातील दुर्गादेवीच्या उत्सवावर निर्बंध घालण्यापासून हिंदूंना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्यापर्यंत ममतादीदींनी काही शिल्लक ठेवले नाही. नवरात्रीच्या काळात ममता यांनी काही ठिकाणी दुर्गादेवीची मूर्ती स्थापन करतांना देवीच्या हातातील शस्त्रेही काढली होती. यातून खरेतर हिंदूंच्या देवता आणि पराक्रमी हिंदू यांना शस्त्रविहीन अन् शौर्यविहीन दाखवण्याचा प्रयत्न केला. नव्हे तर यातूनही हिंदूंवर कुरघोडी करून देवतांचा अवमानच केला. तसेच बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंदूंची अवस्था ही पशूंसारखी झाली आहे. कधीही आणि कोणत्याही क्षणी अनेक संवेदनशील जिल्ह्यांमध्ये हिंदूंची स्थिती धर्मांधांमुळे काश्मीरप्रमाणे झाली आहे अन् अनेक ठिकाणी हिंदू पलायनाची भूमिका स्वीकारत आहेत. या सर्व घटनांमुळे या निवडणुकीमध्ये त्यांची हार झाली, तर त्यांच्या या हिंदुद्वेषी कर्माची ती फळे असतील, यात शंका नाही. ममतादीदींनी राजकारण इतके खालच्या थराला नेले आहे की, मृतदेहांच्या अंत्ययात्रेतही रॅली काढून प्रचार करायच्या सूचना त्यांनी केल्याचा धक्कादायक ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला. हा व्हिडिओ खोटा असल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले; पण त्यावर कोण विश्‍वास ठेवेल ? या कारणामुळे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या ममतांवर चोहोबाजूंनी टीकास्त्र झडत आहे. त्यामुळे बॉम्ब बनवण्याचा कारखाना बनलेल्या ‘ममता बानो’ यांच्या बंगालमध्ये सत्तापालट अपेक्षित आहे, असे तेथील पीडित जनतेला वाटले, तर चूक नव्हे !

भाजपची रणनीती

तृणमूलच्या खासदार अभिनेत्री नुसरत जहाँ ‘मी १ घंट्यापेक्षा अधिक प्रसार करणार नाही’, म्हणून कार्यकर्त्यांची विनवणी धुडकावून त्या गाडीतून उतरल्या. शरद पवार यांनीही बंगाल दौरा रहित केला. पूर्वी त्यांची बाजू घेणारे मिथून चक्रवर्ती यांनाही भाजपने स्वतःच्या बाजूने प्रचारात उतरवले. भाजपच्या येथील रणनीतीतील एक महत्त्वाची रणनीती यशस्वी ठरली. ती म्हणजे खुद्द ममता यांच्या विरोधात पूर्वी त्यांच्या पक्षात असणारे शुभेंदू यांना उभे केले. हिंदु लोकप्रतिनिधींच्या हत्या ही बंगालमध्ये आता इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की, महिलांच्या माध्यमातून त्यांच्यावर आक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने त्यांच्या ताफ्यात महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला; पण एवढी जोखीम घेऊनही त्यांना उभे केले. राहुल गांधी यांनी स्वतःला आदर्शाचा पुतळा असल्याचे भासवण्यासाठी सभा न घेण्याचे घोषित केले. अन्य दोन पक्षांची कोंडी करण्याचेही राजकारण होते; मात्र युद्धारंभ केलेल्या भाजपने त्यालाही दाद दिली नाही. आज केवळ आणि केवळ हिंदुहिताचा पक्ष जनतेला हवा आहे. बंगालमधील हिंदूंच्या हत्या सत्रावर सत्तापालट हे उत्तर असेल, तर तो अवश्य होऊ दे; मात्र सत्तापालट होऊनही हिंदूंच्या हत्या होतच राहिल्या, तर त्यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव काहीही नसेल !