कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे वेळेत अन् अपुर्‍या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

  • श्रीरामपूर (जिल्हा नगर) – १२ एप्रिलला शहरभर फिरूनही रुग्णांना खाटा मिळाल्या नाहीत. खाट उपलब्ध नसल्याने येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला.
  • बीड आणि नागपूर – येथे रुग्णालयात रुग्णांना अक्षरशः भूमीवर  झोपवून उपचार करण्यात आले.
  • पुणे – एका रुग्णालयात ५३७ व्हेंटिलेटर खाटा होत्या; पण त्याही संपल्या. त्यामुळे रुग्णांची परवड झाली.
  • जळगाव – येथे ७ दिवसांनी लसीचा पुरवठा करण्यात आला.
  • लातूर – येथे रेमिडिसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे जाऊन त्यांनी इंजेक्शनची मागणी केली.
  • मुंबई – येथील गोदरेज रुग्णालयातील २५ रुग्णांना सुविधांअभावी महापालिकेच्या रुग्णालयात हालवण्याची वेळ आली.
  • नागपूर – येथील रुग्णालयामध्ये खाटा उपलब्ध नाहीत. रुग्णांना भूमीवर झोपवून ऑक्सिजन लावण्यात आला आहे. १०० पेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयात प्रवेश मिळण्यासाठी वाट पहात आहेत. रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण भरती केलेले आहेत. काही रुग्णांना रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावलेला आहे.

नाशिक येथे ६ सहस्र रुपयांच्या औषधाच्या देयकाची रक्कम २६ सहस्र रुपये आकारली !

नाशिक – येथे एका रुग्णालयामध्ये केवळ औषधांचे देयक २६ सहस्र रुपये केले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याविषयी त्यांच्या ओळखीच्या औषधाच्या दुकानामध्ये चौकशी केली असता त्याची रक्कम केवळ ६ सहस्र रुपये असल्याचे समजले. त्यांनी हा सर्व प्रकार फेसबूक लाईव्ह केला. त्यानंतर रुग्णालयाने आपापसांत मिटवून केवळ ६ सहस्र रुपयांचे देयक केले.

साधकांसाठी सूचना, तसेच वाचक आणि हितचिंतक यांना नम्र विनंती

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा यांसारख्या ठिकाणी आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

सध्या कोरोना महामारीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी भरती होणार्‍या रुग्णांची संख्याही अधिक आहे. जे रुग्ण तपासणी अथवा उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जात आहेत, त्यांना अनेक कटू अनुभवही येत आहेत, उदा. तपासणीसाठी नमुने घेतांना ते योग्य प्रमाणात न घेतल्याने रुग्णांना पुन्हा नमुने देण्यासाठी धावपळ करावी लागणे, तपासणी अहवाल वेळेत न देणे, तपासणी अहवालाचा सविस्तर तपशील न देणे, रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णाला उपचारांसाठी भरती करून घेण्यास नकार देणे; मात्र प्रतिष्ठित व्यक्तीने दूरभाष केल्यावर रुग्णाला भरती करून घेऊन व्हेंटिलेटरवर ठेवणे, शासकीय रुग्णालयांत विनामूल्य मिळणारे इंजेक्शन उपलब्ध नसणे, त्यामुळे बाहेरून सहस्रो रुपयांचे इंजेक्शन विकत आणायला लावणे, औषधांचा अवैध साठा करून काळा बाजार करणे, अहवाल प्राप्त नसल्याचे कारण सांगून मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात न देणे, मृतदेह कह्यात देतांना रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल होणे, कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागा उपलब्ध न होणे इत्यादी.

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]