बंगालमध्ये भाजपच्या खासदाराचे घर आणि कार्यालय यांवर १५ गावठी बॉम्बद्वारे आक्रमण

  • तृणमूल काँग्रेसवर आरोप

  • भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार !

बंगाल म्हणजे गावठी बॉम्ब बनवण्याचा मोठा कारखाना झाला असून त्याच्या निर्मितीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते पुढे आहेत, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत; मात्र याविरोधात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा कृती का करत नाही ? अशा प्रकारची बॉम्बची निर्मिती वर्षानुवर्षे कशी होत रहाते ?

सौजन्य -ANI

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगणामधील जगदल येथे १७ मार्चच्या रात्री भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घर आणि कार्यालय येथे गावठी बॉम्बद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणामध्ये एका मुलासह ३ जण घायाळ झाले.

खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, माझे कार्यालय ‘मजदूर भवन’वर संध्याकाळी बॉम्ब फेकण्यात आले. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत माझ्या वाहनाला लक्ष्य बनवून बॉम्ब फेकण्यात आले. सुमारे १५ ठिकाणी बॉम्ब फेकले गेले आणि पोलिसांनी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले. परिसरात कायदा व्यवस्था कोलमडली आहे.

प्रशासन कुठे आहे? पोलीस काहीच का करत नाहीत ? या आक्रमणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात येईल. जर पोलीस काही कारवाई करू शकत नसतील, तर मग हा खेळ अतिशय धोकादायक होईल आणि तृणमूल काँग्रेस अन् गुंड संपतील. ‘लोकांनी मतदान करु नये, यासाठी भीती निर्माण केली जात आहे’, असा आरोपही त्यांनी केला.