भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधानंतरही चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधणार

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधाला चीन कोणतीही किंमत देत नाही, हेच त्याने दाखवून दिले आहे. चीन हे धरण बांधण्याचा विचारही करणार नाही एवढा धाक तो निर्माण करणार का ?

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधाला न जुमानता चीनच्या संसदेची ब्रह्मपुत्रा नदीवर धरण आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याला अनुमती

बीजिंग (चीन) – चीनच्या संसदेने ब्रह्मपुत्रा नदीवर धरण आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याला अनुमती दिली आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे धरण अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर तिबेटमधून वहाणार्‍या ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणार आहे. भारतासह बांगलादेशाने यापूर्वीच या योजनेविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘असे धरण उभारल्यास आमच्या देशांच्या संबंधित भागांत पूरसदृश स्थिती निर्माण होईल’, अशी भीती या देशांनी व्यक्त केली होती; मात्र ‘या धरणामुळे अन्य देशांना कोणत्याही प्रकारे उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली जाईल’, असे चीनने म्हटले होते.

तिबेटच्या स्वायत्त भागातून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते. त्यानंतर ही नदी आसाममध्ये प्रवेश करते. आसाममधून ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते. ब्रह्मपुत्र नदी ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आणि बांगलादेशमध्ये ‘जीवनवाहिनी’ समजली जाते.