‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणारे चि. अमित हडकोणकर आणि समजूतदार अन् सेवेची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. अदिती पवार !

‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे चि. अमित हडकोणकर आणि समजूतदार अन् सेवेची तळमळ असलेल्या अधिवक्त्या चि.सौ.कां. अदिती पवार !

चि. अमित हडकोणकर यांची गुणवैशिष्ट्ये

१. सौ. निशा धाटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. इतरांशी प्रेमाने जवळीक साधणे

१. ‘अमितची सर्वांशी चांगली जवळीक आहे. लहान मुले असोत किंवा वयस्कर व्यक्ती असोत, सर्वांनाच त्याच्याविषयी प्रेम वाटते. तो गावातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागतो. त्यामुळे सर्वांना त्याच्याविषयी आपलेपणा वाटतो. माझ्या वैयक्तिक किंवा साधनेतील अडचणी असोत, मी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते. माझ्या काही चुका असल्यास तो मला तेवढ्याच प्रेमाने सांगतो.

२. माझ्या सासरी मंदिरातील वर्धापनाच्या दिवशी ‘दिवजोत्सव’ असतो. त्या दिवशी माहेरचे कुणी ना कुणी तरी घरी येतात. माझे भाऊ विदेशात असल्याने त्यांना येता येत नाही. माझ्या लग्नाला आता ९ वर्षे झाली. या ९ वर्षांत अमितने या दिवशी माझ्या सासरी येणे कधीच चुकवले नाही. तो कितीही व्यस्त असला, तरी घरी येऊन जातो. माझ्या माहेरच्या लोकांनाही तो घरचा सदस्यच वाटतो.

१ आ. साहाय्य करण्यास तत्पर : कुणीही, कधीही आणि कसलेही साहाय्य मागितले, तरी त्याची साहाय्य करण्याची सिद्धता असते. तो कधीच ‘नाही’ म्हणत नाही. त्याच्याकडे कुठलीही अडचण घेऊन गेले, तर तो ‘ती अडचण सोडवणारच’, असा विश्‍वास असतो. तो विश्‍वास आतापर्यंत कधीच खोटा ठरला नाही.’

२. श्री. यतीश गावणेकर, फोंडा, गोवा.

२ अ. सेवेतील तत्परता आणि सतर्कता

१. कुठलीही सेवा करतांना एखादे सूत्र अथवा सेवा ते त्या वेळेतच तत्परतेने पूर्ण करतात. त्या वेळी ‘नंतर करूया’, अशा विचाराने ‘ते सूत्र विसरून जाऊ शकते’ किंवा ‘चालढकलपणा होऊ शकतो’, हे लक्षात घेऊन ते नेहमी सतर्क असतात.

२. अधिकोष किंवा इतर कार्यालय येथे सेवेला जायचे असल्यास लागणारी सर्व कागदपत्रे ते समवेत घेऊन जातात; पण ‘आयत्या वेळी कुठल्या संभाव्य अडचणी येऊ शकतात ?’ आणि ‘त्या प्रसंगी कोणती कागदपत्रे लागू शकतात ?’, असा दूरदृष्टीने अन् बारकाईने विचार करून ते सर्व पूर्वसिद्धता करून जातात. त्यामुळे नियोजित सेवा पूर्ण होण्यात त्यांना सहसा अडचणी येत नाहीत.

२ इ. सेवाभाव : गणेश चतुर्थीच्या काळात अमितदादा माझ्याकडे सेवेला येत होते. त्या वेळी सकाळी आल्यावर ते स्वतःहून स्वच्छता करून देवपूजा करणे इत्यादी सर्व करून सेवेला आरंभ करायचे. ते इतरांवर अवलंबून न रहाता स्वतःचे घर किंवा आश्रम समजून लक्षात आलेल्या सर्व सेवा करायचे. यावरून त्यांच्या मनाची व्यापकता लक्षात आली.

२ ई. परिपूर्ण सेवा करणे : एखादी सेवा पूर्ण केल्यावर ते त्या धारिकेमध्ये किंवा सेवा पूर्ण करून ‘फाईल’ केलेल्या ‘पेपर’वर ‘पेन्सिल’ने सविस्तर शेरा लिहितात. त्यामुळे काही वर्षांनीसुद्धा तो ‘पेपर’ बघितला, तर इतरांना तपशील मिळू शकतो आणि ‘ही सेवा पुढे कुणाला कळवली आहे’, तेही लक्षात येते.

२ उ. शरणागतभावाने सेवा केल्याने ती अचूक होणे : सनातन संस्थेचे काही अहवाल सरकारला तिमाही, वार्षिक आणि पंचवार्षिक असे ‘इलेक्ट्रॉनिक मोड’वर किंवा ‘ऑनलाईन’ सादर करावे लागतात. त्या सादरीकरणाच्या वेळी त्यांची शरणागतीने प्रार्थना होते. ‘त्यामुळे ‘सर्व अहवाल वेळेवर सादर होतात’, अशी अनुभूती त्यांना येते.’’

३. श्री. श्रीकांत देसाई, बोरी, गोवा.

३ अ. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणे : गेल्या ८ मासांपासून मी कोरोना महामारीमुळे आश्रमात जाऊ शकत नाही. या कालावधीत ते स्वतःची सेवा सांभाळून माझ्याकडील बर्‍याचशा सेवा करतात.

अधिवक्त्या चि.सौ.कां. अदिती पवार यांची गुणवैशिष्ट्ये

१. श्री. गणेश पवार (चि.सौ.कां. अदिती यांचे वडील), गोवा

१ अ. प्रेमळ : ‘अदिती लहानपणापासून प्रेमळ आणि हळव्या स्वभावाची आहे. ती नेहमी आनंदी असते. तिच्या भावंडांवर तिचे पुष्कळ प्रेम आहे.

१ आ. शांत आणि समजूतदार : कोणतेही निर्णय सांगतांना शांतपणाने आणि समजूदारपणाने सांगते. मला तिचा आधार वाटतो.

१ इ. कोणतीही चुकीची गोष्ट तिला मान्य होत नाही.

१ ई. धर्माभिमान असणे : अदितीमध्ये धर्माभिमान असल्यामुळे तिने वकिली करण्याचा निर्णय घेतला. आता ती सनातन संस्थेच्या माध्यमातून पूर्णवेळ सेवा करत आहे.

१ उ. सेवेची तळमळ : अदिती घरी असली, तरी तिचे लक्ष सेवेकडे असते.

१ ऊ. जाणवलेले पालट

१. पूर्वी तिला खाण्यात पुष्कळ रुची होती; पण आता तसे नाही. जे असेल ते ती खाते.

२. पूर्वी तिचा स्वभाव हट्टी होता. ‘प्रत्येक गोष्ट त्याच वेळी झाली पाहिजे’, असे होते; परंतु आता पुष्कळ पालट झाला आहे.

२. सौ. सुहासिनी पवार (चि.सौ.कां. अदिती यांची आई), गोवा

२ अ. देवाची आणि साधनेची आवड : तिला लहानपणापासून देवाची आवड आहे. लहान असतांना कलावतीआईंच्या बालोपासनेला जायची. नंतर सनातनमध्ये आली. ती आम्हाला साधनेचे महत्त्व समजावून सांगते. अदितीने आश्रमात राहून वकिलीचे शिक्षण केले. पूर्णवेळ साधना करण्याची तिला पुष्कळ तळमळ होती.

३. श्री. शुभम पवार (अदिती यांचा लहान भाऊ), वाराणसी

३ अ. सकारात्मक असणे : माईला (अदितीला) मी कधीच नकारात्मक किंवा निरुत्साही पाहिले नाही. ती नेहमी आनंदी असते. सरकारी कामांना पुष्कळ वेळ लागतो; पण सरकारी व्यवहार करतांनाही ती नेहमी सकारात्मक आणि स्थिर असते. ती म्हणते, ‘‘साधना म्हणजे काय ? तर या अशाच प्रसंगांत आपल्याला स्थिर रहाता आले पाहिजे.’’

३ आ. सेवेचे गांभीर्य : माईत सेवेप्रती पुष्कळ गांभीर्य आहे. प्रत्येक सेवा ती गांभीर्याने पूर्ण करते.

३ इ. शिकण्याची वृत्ती असणे : माई सतत शिकण्याच्या स्थितीत असते. वकिली असेल, सूत्रसंचालनाची सेवा असेल किंवा दुचाकी शिकणे असेल, या सर्व गोष्टी ती आश्रमात येऊन शिकली.

३ ई. समजूतदारपणा : लहानपणापासून आतापर्यंत माईने मला समजून घेऊन प्रोत्साहन दिले आहे. ती कधीच माझे मन दुखावत नाही. तिचा समजूतदारपणा शिकण्यासारखा असतो. घरातील महत्त्वाच्या निर्णयांच्या संदर्भात वडील सर्वप्रथम माईशी चर्चा करतात.

३ उ. काटकसरीपणा : माझ्याकडून आवश्यकतेपेक्षा अधिक मूल्याची वस्तू घेतली जात असेल, तर ती त्वरित मला त्याची जाणीव करून देते आणि ‘साधनेच्या दृष्टीने किती आवश्यक आहे, त्याप्रमाणे आपण घेतले पाहिजे’, असे सांगते.

३ ऊ. साधनेविषयी दृष्टीकोन देणे : एखादा प्रसंग सांगण्याची तिची एक वेगळीच शैली आहे. प्रसंग सांगून झाल्यावर ती ‘साधनेच्या दृष्टीने तो कसा होता ?’, हे सांगते. त्यामुळे त्यातून शिकायला मिळते. ती घरातील सर्वांना साधनेच्या दृष्टीने योग्य दृष्टीकोन देते. ती बोलत असतांना ‘तिच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव दृष्टीकोन देत आहेत’, असे वाटते आणि भाव जागृत होतो.

३ ए. पुढाकार घेणे : येणार्‍या आपत्काळाची झळ पहाता तिने आई-वडिलांना गोव्याला रहाण्याच्या दृष्टीने घर घेण्यास सांगितले. शहरात रहाण्यापेक्षा गोव्यात राहून आश्रमात सेवा करण्याचा विचार दिला आणि त्याप्रमाणे तिने गोव्यात घरही घेतले. यासंदर्भातील सर्व व्यवहार, तसेच अन्य गोष्टी तिनेच सांभाळल्या. यावरून तिची दूरदृष्टी आणि भगवंतावरील दृढ श्रद्धा दिसून येतो.

‘माईचे सर्व गुण मला शिकता येऊन ते माझ्यात आत्मसात होऊ देत आणि परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून होऊ दे’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना आहे.’


अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांनी वैवाहिक जीवनासाठी दिलेल्या आशीर्वादरूपी शुभेच्छा !

पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

१. लहान वयात पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे

‘कु. अदितीताई एकदम शांत मुलगी आहे. गुरुकृपेने फार लहान वयात मायेत न अडकता ती साधनेत आली. तिचा मोठेपणा असा आहे की, ती मला म्हणाली, ‘‘पू. काका, तुम्ही आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर संपर्कासाठी आमच्या गावात आला असतांना तुम्ही तरुण अधिवक्ते किंवा ‘एल्.एल्.बी.’ करणारे विद्यार्थी यांना ‘साधनेत या’, असे सांगत होता. त्यानुसार देवाने मला विचार दिला आणि गुरुकृपेने मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.’’ हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नियोजन होते, इतकेच मी मानतो.

२. परात्पर गुरुदेवांना अपेक्षित सेवा करणे

अदितीताईमध्ये मन लावून सेवा करणे, विचारून घेणे, हा चांगला भाग आहे. लहान वयात परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करणे, ऐकणे, विचारून घेणे, आज्ञापालन करणे, तसेच नवनवीन विषयांत रस घेऊन ती सेवा पूर्ण करणे, असे गुण तिच्यात आहेत. ती सहसाधिकेसह एकत्रित सेवाही चांगली करते.

३. सेवेची तळमळ असल्याने झोकून देऊन सेवा करणे

हिंदु विधीज्ञ परिषदेत सेवा करतांना विषय समजून घेऊन सेवा करण्याचा तिचा दृष्टीकोन असतो. काही वेळा ताण आला, तर लगेच विषय पुन्हा समजावून घेते आणि झोकून देऊन ती सेवा पूर्ण करते. ‘अधिवक्ता अधिवेशना’च्या काळातही ती तळमळीने सेवा करते. तेथे ‘स्वत:ला आराम मिळेेल का ?’ हे न बघता ती सतत सेवा करते. जावईबापूही (श्री. अमित हडकोणकर) साधक आहेत. ते दोघे मिळून गुरूंना अपेक्षित अशी सेवा करतील, हे नक्की !

मी अदितीताईला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतो, तसेच ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो, ‘आता ते दोघे मिळून दुप्पट गतीने सेवा करतील आणि पुढची आध्यात्मिक प्रगती करतील अन् करोत!’

– गुरुदेवांच्या चरणी अर्पण,

अधिवक्ता (पू.) सुरेश म. कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय आणि संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद. (७.२.२०२१)