१. नऊ वर्षांची असतांना शाळेत जातांना मार्गातील एका पुलावर काही क्षणांसाठी आकृतीच्या रूपात अस्पष्टपणे देवता दिसणे आणि आता ते रूप आठवल्यावर ‘ते कृष्णाशी जुळत होते’, असे वाटणे
‘मी ९ वर्षांची असतांना माझे वडील मला दुचाकीवरून शाळेत नेतांना मार्गातील एका पुलावर मला एक देवता आकृतीच्या रूपात दिसायची. तेव्हा मी दुचाकीवरून मागे वळून शेवटपर्यंत त्या देवतेच्या दिशेने पहात असे; पण ती देवता मला काही क्षणांसाठीच आणि तीही अस्पष्ट दिसायची; परंतु मला तिथे देवतेचे अस्तित्व जाणवत असे. आता त्या देवतेचे रूप आठवल्यावर ‘ते कृष्णाशी जुळत आहे’, असे मला वाटते.
२. परीक्षेच्या काळात आलेल्या अनुभूती
अ. परीक्षेच्या काळात ‘प.पू. भक्तराज महाराज त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून मला चैतन्य देत आहेत आणि माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होत आहे’, असे मला जाणवायचे.
आ. मी आयुर्वेदाध्ययनाच्या प्रथम वर्षीच्या ‘शरीररचना’ या विषयाच्या परीक्षेला जात होते. तेव्हा मी आई जगदंबेला प्रार्थना करून जेवढे वाचले, तेच नेमके परीक्षेमध्ये विचारण्यात आले.
३. महाविद्यालयातून घरी परततांना आगगाडीतून पाय घसरून गाडी आणि फलाट यांमध्ये अडकणे अन् त्या वेळी श्रीकृष्णाने पोलिसांच्या माध्यमातून रक्षण केल्याचे जाणवणे
मी महाविद्यालयातून घरी परत येतांना माझा पाय आगगाडीमध्ये घसरला आणि मी गाडी अन् फलाट यांमध्ये अडकले. तेव्हा ‘श्रीकृष्णाने पोलिसांच्या माध्यमातून मला लगेच तिथून बाहेर काढले आणि माझे प्राण वाचवले’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या ‘बॅगे’तील धातूची बाटली आणि डबा वाकडे झाले; परंतु मला दुखापत झाली नाही.
४. मार्ग ओलांडतांना स्वतःभोवती संरक्षककवच असल्याने वेगवान दुचाकीद्वारे होणार्या संभाव्य अपघातापासून रक्षण होणे
मी ‘सनातन संस्थे’द्वारे घेतल्या जाणार्या आरोग्य तपासणीच्या उपक्रमासाठी जातांना आवश्यक साहित्य घेण्यासाठी एका ठिकाणी थांबले. तिथे मी साहित्य घेतल्यावर मार्ग (रस्ता) ओलांडत होते. तेव्हा एक दुचाकी भरधाव वेगाने माझ्याच दिशेने येत होती; पण त्या वेळी माझ्याभोवती २ फूट आकाराचे जाड संरक्षककवच असल्याचे मला जाणवले. ती दुचाकी माझ्या अंगापर्यंत न येता काही अंतरावरून दूर निघून गेली. अशा प्रकारे संभाव्य अपघातापासून माझे रक्षण झाले.
५. आगाशीत (बाल्कनीत) उभे असतांना आकाशात चमकणारी वस्तू पाहून कृष्णाला ‘हे कृष्णयान किंवा कृष्णताराच आहे’, असे सांगणे आणि स्थूल डोळ्यांना पांढर्या रंगाचे दिसणारे ते ‘कृष्णयान’ छायाचित्रामध्ये निळ्या रंगाचे दिसणे
एकदा मी कृष्णाच्या अनुसंधानात आगाशीमध्ये (बाल्कनीमध्ये) उभे होते. तेव्हा आकाशात एक गोष्ट चमकत असल्याचे मला दिसले; पण ‘तो तारा आहे कि विमान आहे’, हे मला उमगत नव्हते. त्या वेळी मी कृष्णाला सांगितले, ‘तो तूच आहेस, म्हणजे ते कृष्णयान किंवा कृष्णताराच आहे.’ नंतर मी त्याचे छायाचित्र काढले. तेव्हा मला स्थूल डोळ्यांना पांढर्या रंगाचे दिसणारे ते ‘कृष्णयान’ छायाचित्रामध्ये निळ्या रंगाचे दिसले.
६. कृष्णाची आठवण येऊन त्याला ‘तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे. तू लवकर ये’, अशी आर्ततेने प्रार्थना करणे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याशी भेट होऊन त्यांच्या माध्यमातून कृष्णाची प्रीती अनुभवणे
६ अ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना घरी घेऊन येतांना ‘त्यांच्या रूपातील श्रीकृष्णाला घराची वाट दाखवत आहे आणि तो स्वतःच्या मागे चालत आहे’, हे अनुभवतांना पुष्कळ आनंद होणे अन् ‘साधू-संत येती घरा, तोची दिवाळी दसरा ।’, हे वचन अनुभवायला मिळणे : मार्च २०१९ मध्ये सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (सद्गुरु ताई) यांच्याशी भेट होण्यापूर्वी मला कृष्णाची पुष्कळ आठवण येत होती. तेव्हा मी कृष्णाला आर्तभावाने रडत सांगितले, ‘आता मला तुझ्याशी केवळ सूक्ष्मातून बोलायचे नाही, तर तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे. तू लवकर ये.’ काही दिवसांनी सद्गुरु ताई या कर्जत येथील एका मंदिरात श्री गणपतिमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आल्या. तेव्हा त्या प्रथम काही कालावधीसाठी आमच्या घरी येणार होत्या. वडिलांनी मला सद्गुरु ताईंना घरी आणण्यासाठी एका ठिकाणी जाण्यास सांगितले. माझा भगवंतभेटीचा विलक्षण क्षण समोर आला. सद्गुरु ताईंची भेट झाल्यावर त्यांना घरी घेऊन येतांना मी त्यांच्या रूपातील श्रीकृष्णाला घराची वाट दाखवत होते, तो माझ्या मागे चालत होता आणि मला पुष्कळ आनंद होत होता. तेव्हा मला ‘साधू-संत येती घरा, तोची दिवाळी दसरा ।’, हे वचन अनुभवायला मिळाले. त्या वेळी सर्वत्र चैतन्यमय दिवे, तसेच झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांची तोरणे लावून सजावट केल्याचे सूक्ष्मातून मला दिसत होते. सृष्टीला आनंद झाला होता; कारण माझा कृष्ण घरी येत होता.’
६ आ. सद्गुरु अनुराधाताई घरी आल्यावर कृष्णाने त्यांच्या माध्यमातून स्थुलातून समोर येऊन सर्वकाही दिल्याचे वाटून अवर्णनीय आनंद मिळणे आणि त्यांनी दुसर्यांदा भाव-आलिंगन दिल्यावर स्वतःचे अस्तित्व विसरल्याची अनुभूती येणे : सद्गुरु ताईंनी घरात येताच ‘किती गोड बाळ आहे’, असे बोलून माझी गळाभेट घेतली. तेव्हा मला सर्वकाही मिळाल्याचे वाटून ‘शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाही’, असा आनंद मिळाला. सद्गुरु ताईंनी मला त्यांच्याजवळ बसायला बोलावले आणि त्या माझ्याशी आनंदाने बोलल्या. अशा प्रकारे कृष्णाने सद्गुरु ताईंच्या माध्यमातून स्थुलातून समोर येऊन मला सर्वकाही दिले. नंतर कृष्णाने मला सुचवले, ‘भाव पत्र लिहून सद्गुरु ताईंना दे.’ लगेच मला आवश्यक त्या आकारातील पत्रिकेचा सुंदर कागद मिळाला आणि मी त्यावर लिहिलेले पत्र सद्गुरु ताईंनी वाचण्यासाठी हातात घेतले. ते दृश्य पाहून मला आनंद झाला आणि माझ्या डोळ्यांतून बाहेर पडणारे भावाश्रू थांबतच नव्हते. मग सद्गुरु ताईंनी मला दुसर्यांदा भाव-आलिंगन (गळाभेट) दिले आणि मी स्वतःचे अस्तित्वच विसरले. नंतर सद्गुरु ताईंनी निघतांना मला भेट म्हणून ‘पवित्र विभूती’ दिली. घरून सद्गुरु ताई निघाल्या आणि मी त्यांना सोडायला त्यांच्या समवेत चालले. तेव्हा त्यांनी माझा हात हातात घेतल्यावर माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. त्या वेळी ‘त्यांचा हात सोडूच नये’, असे मला वाटत होते.
६ इ. सद्गुरु अनुराधाताईंनी सांगितलेल्या नामजपाद्वारे अखंड अनुसंधान अनुभवता येणे आणि सद्गुरूंच्या संकल्पानुसार प्रत्येक कृती करतांना ‘ती सहजतेने आणि आपोआपच होते’, असे जाणवणे : त्या दिवशी सद्गुरु ताईंनी घरून निघतांना मला ‘श्री भवानीदेवीचा नामजप कर’, असे सांगितले. त्या वेळेपासून काही दिवस माझ्याकडून तो नामजप अखंड चालू राहिला. त्यातून मला अखंड अनुसंधान अनुभवता आले. तेव्हा सद्गुरूंच्या संकल्पानुसार प्रत्येक कृती करतांना ‘ती सहजतेने आणि आपोआपच होते’, असे मला जाणवले.
६ ई. कृष्णा, लवकरच यायचे आहे, तुझ्या सुकोमल चरणी ।
वरील प्रसंगी सद्गुरु ताईंची भेट झाल्यानंतर मला सुचलेली कविता पुढे देत आहे.
कृष्णा, मला लवकरच यायचे आहे ।
तुझ्या सुकोमल चरणी ॥ १ ॥
अतीव प्रेमळ जगदंबा (टीप) करी मनधरणी ।
मनू, पोचवते तुला तुझ्या कृष्णचरणी ॥ २ ॥
दिलाय तुला गुरुमंत्र सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी ।
आता एकच ध्यास हा जप जुडू दे श्वसनी ।
टीप – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी आई जगदंबेचा, म्हणजे श्री भवानीदेवीचा नामजप करायला सांगितला.
७. दोन्ही हातांवर ‘ॐ’ उमटण्याविषयी आलेल्या अनुभूती
अ. मार्च २०१९ मध्ये एके दिवशी रायगड जिल्ह्यात धर्मप्रचार करणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता लोटलीकरकाकू आमच्या घरी आल्या आणि त्यांनी सर्वांना सनातन आश्रमातील प्रसाद दिला. तेव्हा त्यांनी माझ्या हातावर दिलेला प्रसाद मी ग्रहण करताच मला उजव्या तळहातावर ‘ॐ’ उमटतांना दिसला.
आ. जून २०१९ मध्ये माझ्या डाव्या हातावर अस्पष्ट दिसणारे आणि लहान-मोठ्या आकारांचे चार-पाच ‘ॐ’ उमटले होते.
इ. माझ्या डाव्या हातापेक्षा उजव्या हाताचा तळवा अधिक श्वेताभ्र (पांढरा) दिसतो. जेवढ्या भागात ‘ॐ’ आहे, तेवढाच तळहात आणि ‘ॐ’चा वर्ण श्वेतच असल्याचे दिसते.
८. कृतज्ञता
‘हे श्रीकृष्णा, मला सद्गुरु ताईंच्या रूपाने तूच भेटायला आलास. मला तुझे भावविश्व अनुभवायला देऊन योग्य दिशा दिलीस. तुझ्या या भेटीसाठी अंतर्मनापासून तुझ्या नीलकमलवत् चरणकमलांशी कृतज्ञताभावरूपी पुष्पे अर्पण करते. तूच माझ्याकडून अनुभूती लिहून घेतल्या, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ कृष्णा !’’
– कृष्णाची मनु (वैद्या (कु.) मनाली देशमुख), कर्जत, जिल्हा रायगड. (२८.६.२०१९)
|