सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

देहलीतील हिंसाचाराचे प्रकरण

संजय राऊत

नवी देहली – ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची अपकीर्ती केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे; पण सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणार्‍या खर्‍या आरोपींना अटक करत नाही. आरोपी दीप सिद्धू कुठे आहे ? त्याला अटक केला जात नाही; पण सरकारने २०० शेतकर्‍यांना अटक केली आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी केली. प्रजासत्ताकदिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा आणि प्रक्षोभक भाषण करणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यासह इतर ६ जण अद्याप फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी देहली पोलिसांनी बक्षिस घोषित केले आहे.

 (सौजन्य : India Today)

संजय राऊत यांनी मांडलेली सूत्रे . . .

१. आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते. त्या अर्णब गोस्वामीमुळे महाराष्ट्रातील एका निरपराध व्यक्तीने आत्महत्या केली. अशा लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

२. ज्याने ‘ऑफिशियल सीक्रेट कोड’ तोडत बालाकोट एअर स्ट्राईक होण्यापूर्वीच सांगितले, तो (अर्णव गोस्वामी) केंद्र सरकाराच्या शरणात आहे. त्याला तुम्ही सुरक्षा पुरवता. त्याच्याविषयी विचारल्यावर तुम्ही शांत बसता.

३. काल धर्मेंद्र प्रधान बोलत होते आणि आमच्यावर टीका करू लागले. देशात अशी परिस्थिती आहे की, खरे बोलणार्‍याला देशद्रोही ठरवले जाते. जो सरकारला प्रश्‍न विचारील, त्याला देशद्रोही ठरवले जाते.

४. संसदेतील आमचे सहकारी संजय सिंह यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. राजदीप सरदेसाई यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. सिंघु सीमेवर वार्तांकन करणार्‍या पत्रकार आणि लेखक यांच्यावर देशद्रोहाचा खटला नोंदवला जातो.

५. देशातील कायद्यातून भा.दं.वि.ती सर्व कलमे संपवलीत, असे वाटत आहे. आता केवळ देशद्रोहाचे कलम लावले जाते. आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा आदर करतो आणि पुढेही करत राहू. त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे; पण बहुमत अहंकाराने नाही, तर सर्वसंमतीने चालते.