प्रथम वाढदिवसाच्या दिवशी पुणे येथील चि. श्रीनिधी देशपांडे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित !

चि. श्रीनिधी देशपांडे हिला भेटवस्तू देतांना श्रीमती मधुरा तोफखाने आणि समवेत तिची आई सौ. प्रज्ञा देशपांडे

सांगली, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे येथील सनातनचे साधक दांपत्य सौ. प्रज्ञा आणि श्री. सम्राट देशपांडे यांची कन्या अन् सनातनची बालसाधिका चि. श्रीनिधी हिचा पौष कृष्ण पक्ष पंचमी म्हणजेच २ फेब्रुवारी या दिवशी पहिला वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने सौ. प्रज्ञा यांच्या माहेरी म्हणजे सांगली येथील त्यांच्या घरी सगळे एकत्रित जमल्यावर चि. श्रीनिधी हिची पातळी ६१ टक्के झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून घोषित केले. श्रीकृष्णाने दिलेल्या या अनुपम भेटीमुळे देशपांडे आणि रायकर कुटुंबियांना भावाश्रू अनावर झाले.

सनातनच्या साधिका श्रीमती मधुरा तोफखाने यांच्या हस्ते चि. श्रीनिधीला भेटवस्तू आणि खाऊ देण्यात आला. या आनंदप्रसंगी चि. श्रीनिधीची आई सौ. प्रज्ञा देशपांडे, वडील श्री. सम्राट देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), कु. श्रीनिधीचा मोठा भाऊ चि. अर्जुन (वय ५ वर्षे, आध्यात्मिक स्तर ६५ टक्के), सौ. नयना रायकर (सौ. प्रज्ञा यांची आई), श्री. नरेंद्र रायकर (सौ. प्रज्ञा यांचे वडील), श्री. आदित्य रायकर (चि. श्रीनिधीचा मामा), सौ. अर्पिता रायकर, श्रीमती दया कुडाळकर (चि. श्रीनिधीची मावसआजी), तसेच संगणकीय प्रणालीद्वारे कोल्हापूर येथून श्री. श्रीहरि देशपांडे (चि. श्रीनिधीचे आजोबा), सौ. सुलोचना देशपांडे (चि. श्रीनिधीची आजी), तसेच पुणे जिल्ह्यातील साधिका सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या जोडलेल्या होत्या.

आध्यात्मिक पातळी घोषित होण्याच्या आधी ‘आज काहीतरी विशेष घडणार’, असे प्रत्येकालाच वाटत होते.

या प्रसंगी व्यक्त केलेले मनोगत

१. सौ. प्रज्ञा देशपांडे – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये या श्रीनिधीची पातळी घोषित करत असतांना पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे – श्रीनिधी जन्माला आल्यापासूनच तिच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता जाणवते. गुरुमाऊली आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी आम्हा सर्व कुटुंबियांना पुष्कळ आनंद दिला.

३. सौ. मनीषा पाठक – ‘चि. श्रीनिधीचे डोळे बोलके आहेत’, असे जाणवते. जन्मल्यानंतर ‘ती दैवी बालिका असणार’, असे जाणवले होते.

या बातमीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक