पुण्यातील एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याचे प्रकरण
|
पनवेल, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
A day after the Pune Police registered an FIR against Sharjeel Usmani for his speech at the Elgar Parishad conclave, Maharashtra Home Minister Anil Deshmukh said he will be arrested.@vinivdvc reports. https://t.co/QzLtnx9FGA
— News18.com (@news18dotcom) February 3, 2021
३१ जानेवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदु धर्माच्या विरोधात प्रक्षोभक आणि जातीय तेढ निर्माण करणारे भाषण केल्याच्या प्रकरणी सीएएवरून झालेल्या दंगलीतील सध्या जामिनावर असलेला आरोपी आणि हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याच्याविरुद्ध येथील खांदेश्वर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या परिषदेत शरजील उस्मानी, लेखिका अरुंधती रॉय, प्रशांत कनोजिया आणि आयोजक यांनी हिंदू अन् मुसलमान समाजात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याच्या प्रकरणी या सर्वांवर गुन्हा नोंद करावा, अशी तक्रार महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी येथील खांदेश्वर पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी या दिवशी केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशीचा आदेश !
श्री. सेंगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारअर्ज पाठवल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्वरित या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला. ‘गृह सचिव (सुरक्षा आणि अपील) यांच्याकडे हे प्रकरण पुढील चौकशीसाठी पाठवले आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी श्री. सेंगर यांना पाठवलेल्या ‘ई-मेल’मध्ये म्हटले आहे.
शरजीलच्या मुसक्या आवळून त्याला अद्दल घडवाल, अशी मला आशा आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
पुणे – हा प्रकार सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, या संदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी मला आशा आहे. गेल्या एल्गार परिषदेच्या वेळी काय झाले ?, याची जाणीव असतांनाही अशा कार्यक्रमांच्या आयोजनांना पुन्हा अनुमती देणे किती चूक होते, हेच शरजीलच्या विधानांतून दिसते, असे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून शरजील उस्मानीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजील उस्मानीविरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार उस्मानीने केलेल्या भाषणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर उस्मानीविरोधात भादंवि १५३ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि फिर्यादी प्रदीप गावडे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यापुढील काळात अशा प्रकाराची परिषद होता कामा नये, अशी मागणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिलेल्या निवेदनात भाजपने केली आहे.