नेपाळमध्ये संसद विसर्जित करण्यात आल्याने पुन्हा निवडणुका होणार आहेत आणि त्यात विजयी होण्यासाठी ओली यांना भारताचे कौतुक अन् चीनवर टीका करून मते मिळवायची आहेत, त्याच अनुषंगाने ते अशी विधाने करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !
काठमांडू (नेपाळ) – चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करू नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्री ही स्वाभाविक आहे. कोणताही तिसरा देश आमच्यामध्ये येऊ शकत नाही. नेपाळला स्वत:चे स्वातंत्र्य प्रिय आहे. आमचा देश सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेतो. आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी केले. ते ‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. कालपर्यंत चीनचे समर्थन करत भारताला विरोध करणारे आणि भारताने कह्यात घेतलेला नेपाळचा भाग परत घेण्याची भाषा करणारे पंतप्रधान ओली यांनी अचानक चीनवर टीका करून भारताच्या बाजूने बोलणे आश्चर्यजनक म्हटले जात आहे. यामागे ओली यांचा राजकीय स्वार्थ असल्याचे सांगितले जात आहे.
१. ‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार ओली सध्या भारतासमवेत जवळीक वाढवून पक्षामधील नाराज नेते आणि देशातील जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. ओली यांनी याच मुलाखतीमध्ये नेपाळच्या जनतेला संदेश देतांना ‘नेपाळच्या हितापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट अधिक महत्त्वाची नाही’, असे म्हटले आहे.
२. भारतासमवेतचे संबंध पुन्हा सामान्य करत ‘कोरोना लसीचा पुरवठा भारताकडून होईल’, हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न आहे. भारतासमवेत सुधारलेले संबंध आणि कोरोना लस यांच्या आधारे पुन्हा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याची रणनीती ओली यांनी आखल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
३. नेपाळचे परराष्ट्रमंत्री आणि ओली यांचे निकटवर्तीय असणारे प्रदीप ज्ञावली हे १४ जानेवारीला भारत दौर्यावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ओली यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. ज्ञावली हे भारत सरकारसमवेत कोरोना लसीच्या संदर्भात चर्चा करणार आहेत.