आपत्काळातील मकरसंक्रांत कशी साजरी करावी ?

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही मास सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. कोरोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली, तरी ती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अशा वेळी सण साजरे करतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

१. सण साजरे करण्याचे सर्व आचार, (उदा. हळदीकुंकू समारंभ, तिळगूळ देणे, बोरन्हाण आदी) आपल्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती पाहून कोरोनाविषयी शासन-प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून साजरे करावेत.

२. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतांना एकाच वेळी सर्व महिलांना न बोलावता ४-४ च्या गटाला १५-२० मिनिटांच्या अंतराने बोलवावे.

३. तीळगूळ देवाणघेवाण थेट न करता छोट्या पाकिटांमध्ये घालून त्याची देवाणघेवाण करावी.

४. एकमेकांना भेटतांना-बोलतांना मास्कचा वापर करावा.

५. कोणताही सण किंवा उत्सव साजरे करण्याचा उद्देश हा स्वतःमधील ‘सत्त्वगुणाची वृद्धी करणे’ हा असतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रथेप्रमाणे सण-उत्सव साजरे करण्यास मर्यादा असल्या, तरी त्या काळात अधिकाधिक वेळ ईश्‍वराचे स्मरण, नामजप, उपासना आदींना देऊन सत्त्वगुण वाढवण्याचा प्रयत्न केला, तरच खर्‍या अर्थाने सण साजरा केल्यासारखे होईल.

श्री. चेतन राजहंस

मकरसंक्रांतीविषयीचे आध्यात्मिक विवेचन

सण, उत्सव आणि व्रते यांना अध्यात्मशास्त्रीय आधार असल्याने ते साजरे करतांना त्यांतून चैतन्यनिर्मिती होते आणि त्यायोगे अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही ईश्‍वराकडे जाण्यास साहाय्य होते. असे महत्त्व असणारे सण साजरे करण्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून साजरे केल्यास त्याची फलनिष्पत्ती अधिक असते. यासाठी येथे संक्रांत आणि ती साजरी करण्याच्या विविध कृती यांमागील अध्यात्मशास्त्र येथे देत आहोत.

१. उत्तरायण आणि दक्षिणायन 

मकरसंक्रांत या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येकी ८० वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनात मरण आलेली व्यक्ती उत्तरायणात मरण आलेल्या व्यक्तीपेक्षा दक्षिण लोकात (यमलोकात) जाण्याची शक्यता जास्त असते.

२. संक्रांतीचे महत्त्व

या काळात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असल्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो.

३. संक्रांतीला तीळाचा वापर करण्याचे महत्त्व

संक्रांतीला तीळाचा वापर अधिकाधिक प्रकारे करतात, उदा. तीळयुक्त पाण्याने स्नान करून तीळगूळ भक्षण करणे आणि इतरांना देणे, तसेच ब्राह्मणांना तीळदान, शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावणे, पितृश्राद्ध करणे (यात तिलांजली देतात) इत्यादी. श्राद्धात तिळाचा उपयोग केल्याने असुर वगैरे श्राद्धात विघ्ने आणत नाहीत. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत येणार्‍या संक्रांतीला तीळभक्षण लाभदायक असते. अध्यात्मानुसार तिळात कोणत्याही इतर तेलापेक्षा सत्त्वलहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने सूर्याच्या या संक्रमणकाळात साधना चांगली होण्यासाठी तीळ पोषक ठरतात.

३ अ. तीळगुळाचे महत्त्व : तिळात सत्त्वलहरींचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होण्यास साहाय्य होते. तसेच तीळगूळ एकमेकांना वाटल्याने सात्त्विकतेची देवाणघेवाण होते.

४. हळदी-कुंकवातील पंचोपचार

४ अ. हळद-कुंकू लावणे : हळद-कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील श्री दुर्गादेवीचे सुप्त तत्त्व जागृत होऊन ती हळद-कुंकू लावणार्‍या सुवासिनीचे कल्याण करते.

४ आ. अत्तर लावणे : अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन त्या सुवासिनीसाठी न्यून कालावधीत कार्य करते (त्या सुवासिनीचे कल्याण करते).

४ इ. गुलाबपाणी शिंपडणे : गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणार्‍या सुगंधित लहरींमुळे देवतेच्या लहरी कार्यरत होऊन वातावरणाची शुद्धी होते आणि उपचार करणार्‍या सुवासिनीला कार्यरत देवतेच्या सगुण तत्त्वाचा अधिक लाभ मिळतो.

४ ई. ओटी भरणे : ओटी भरणे, म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या इच्छाशक्तीला आवाहन करणे. ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणार्‍या जिवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते.

४ उ. वाण देणे : वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन मग ते देतात. वाण देणे म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन वाण देणार्‍या सुवासिनीला इच्छित फलप्राप्ती होते.

४ उ १. वाण कोणते द्यावे ? : साबण, प्लास्टिकच्या वस्तू यांसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याऐवजी सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, देवतांची चित्रे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, अध्यात्मविषयक ध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

५. किंक्रांत

संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

६. संक्रांतीच्या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे महत्त्व 

या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळ-तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत; म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे.

‘जीवनात सम्यक् क्रांती आणणे’, हे मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे.

७. मकरसंक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व

धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर १०० पटींनी प्राप्त होते.’

संकलक : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.