हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची तत्परतेने कारवाई !
मुंबई – प्रभु श्रीरामाने निर्माण केल्यामुळे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगेचा जलस्रोेत बाधित करणार्या खोदकामाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १ जानेवारी या दिवशी स्थगिती दिली. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबर २०२० या दिवशी महापौरांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर त्याची गांभीर्याने नोंद घेत सौ. किशोरी पेडणेकर यांनी बाणगंगेची प्रत्यक्ष पहाणी करून खोदकामाला स्थगिती दिली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रसाद मानकर, सतीश सोनार, ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे, श्री. ऋत्विक औरंगाबादकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे वरळीचे अध्यक्ष श्री. संगठन शर्मा, धारावी येथील वज्रदल संघटनेचे श्री. विमलचंद जैन, श्री. प्रभाकर भोसले उपस्थित होते.
बाणगंगेच्या बाजूला चालू असलेल्या बांधकामामुळे या कुंडाचा जलस्रोत बाधित होऊन जलस्रोतातून चिखल आणि चिखलमिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे या बांधकामाला स्थगिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापौरांना निवेदन देण्यात आले होते. यामध्ये या बांधकामाला त्वरित स्थगिती द्यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारे बाणगंगेच्या जलस्रोताला बाधा निर्माण करणारे बांधकाम करण्यात येऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रावधान करण्याची विनंती करण्यात आली आहे.
यानंतर महापौरांनी या प्रकरणी प्रत्यक्ष बाणगंगेची पहाणी करण्याचे नियोजन केले. या ठिकाणी स्थानिक प्रभाग अधिकारी, ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल’चे ट्रस्टी यांच्यासह हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित केले होते.
बाणगंगेला दूषित करणार्या खोदकामाला स्थगितीचा आदेश दिल्याविषयी हिंदु जनजागृती समिती, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महापौरांचे आभार व्यक्त करण्यात आले.
विकासकांच्या कामामुळे बाणगंगेचा जलस्रोत बाधित होऊ देणार नाही ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महानगरपालिका
हिंदु जनजागृती समितीने याविषयी माझ्याकडे निवेदन दिले आहे. त्याविषयी वस्तूस्थिती पहाण्यासाठी मी येथे आले. बाणगंगेसारख्या नैसर्गिक स्रोतांचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे; कारण बाणगंगा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. ही संस्कृती टिकवली पाहिजे. बांधकाम व्यावसायिक येथे रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर ‘एम्.आर्.टी.पी.’ कायद्यान्वये कारवाई होईल. जोपर्यंत याविषयीचा अहवाल येत नाही, या कामाला स्थगिती देण्यात येईल.
खोदकामामुळे बाणगंगा लुप्त होण्याची भीती ! – श्री. प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट
बाणगंगा हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थान आहे. या स्रोतातून सहस्रो वर्षे शुद्ध पाणी अखंडपणे येत आहे. या ठिकाणी ‘संभव’ या नावाने विकासकामे चालू केलेल्या बांधकामाच्या खोदकामामुळे बाणगंगेच्या जलस्रोतातून गढूळ पाणी येत आहे. या खोदकामामुळे बाणगंगा लुप्त होण्याची भीती आहे. त्यामुळे हे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे. याविषयी आम्ही मुंबई महानगरपालिका, मंत्रालय आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे तक्रार केली आहे. सध्या दिवसभर काम बंद ठेवून रात्रीचे बांधकाम करून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यात येत आहे. महापौरांनी या कामाविषयीचा अहवाल मागितला आहे. त्या काही चुकीचे होऊ देणार नाहीत, याची आम्हाला निश्चिती आहे.
(सौजन्य : सह्याद्री न्यूज)