कोरोनाच्या संसर्गाच्या कारणामुळे एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली

केवळ कोरोनामुळेच नव्हे, तर यापूर्वी एल्गार परिषदेनंतरचा हिंसक इतिहास सर्वश्रुत असल्याने तिला कधीच अनुमती द्यायला नको, असेच जनतेला वाटते !

पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातील अनुयायी येतात. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्वारगेट पोलिसांकडे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या वतीने अनुमतीसाठी अर्ज करण्यात आला होता; मात्र या परिषदेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.

एएन्आयने या संदर्भातील वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या कारणामुळे ही अनुमती नाकारण्यात येत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एल्गार परिषदेला संमती देऊ नये; म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी, अशी मागणी केली होती.