मुंबई – कोरोनाच्या आपत्काळातही आपण आनंद अनुभवत आहोत, ही सामान्य गोष्ट नाही. ही भगवंताची मोठी कृपा आहे. आपण किती सेवा करतो, यापेक्षा ती कशा पद्धतीने करतो, हे महत्त्वाचे आहे. आपण साधना योग्य पद्धतीने करत आहोत ना ?, हे महत्त्वाचे आहे. ‘गुरुकृपायोग’ हा जलद आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे. तो विविध साधनामार्गांचा समुच्चय आहे. एवढ्या अल्प कालावधीत आपल्याला जलद आध्यात्मिक उन्नती आणि आनंदप्राप्ती यांचे ज्ञान प्राप्त झाले, याविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञ रहायला हवे. व्यवहारात ज्याप्रमाणे आपण पहिल्या इयत्तेमधून पुढच्या इयत्तेत जातो, त्याप्रमाणे अध्यात्मातही पुढचे टप्पे आहेत. आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया समजून घ्यायला हवी, असे चैतन्यमय मार्गदर्शन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी येथे केले. समाजातील जिज्ञासूंसाठी आयोजित ऑनलाईन सत्संग सोहळ्यात त्या बोलत होत्या.
११ डिसेंबर या दिवशी पश्चिम आणि बृहन्मुंबई, तर १२ डिसेंबर या दिवशी मध्य आणि नवी मुंबई, तसेच १३ डिसेंबर या दिवशी ठाणे आणि रायगड येथील जिज्ञासूंनी या सत्संग सोहळ्यांचा लाभ घेतला.
या सत्संग सोहळ्यात उपस्थित जिज्ञासूंनी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनाचा भावाच्या स्तरावर लाभ घेतला. साधनेला प्रारंभ केल्यावर आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभवही जिज्ञासूंनी सांगितले. काही जिज्ञासूंनी स्वभवादोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न केल्यामुळे तणाव न्यून होऊन जीवन आनंदी झाल्याचे सांगितले. जिज्ञासूंनी त्यांना आलेले अनुभव उत्स्फूर्तपणे सांगितले. प्रारंभी सत्संग सोहळ्याचा उद्देश आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याची माहिती सांगण्यात आली. नंतर जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूतींचे विश्लेषण करण्यात आले.
त्यामुळे जिज्ञासूंना ‘अनुभूती म्हणजे काय?’, हे सहज अवगत झाले. साधनेला प्रारंभ केल्यावर ईश्वराचे तत्त्व कसे कार्यरत होते, हे जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूतींच्या माध्यमातून अनुभवले. त्यानंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या सत्संग सोहळ्याचा एकूण ५१० जिज्ञासूंनी ऑनलाईन माध्यमाद्वारे लाभ घेतला.