कुतुब मीनार परिसरातील मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आल्याने ती हटवावी ! – देहली येथील न्यायालयात याचिका

  • पहिले जैन तीर्थंकर ऋषभ देव आणि भगवान विष्णु यांच्या नावाने पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी प्रविष्ट केली याचिका

  • मंदिरांचे अवशेष वापरून मशीद बांधल्याने तेथे मुसलमान करत नाहीत नमाजपठण !

  • कुतुब मीनार हा वराहमिहिर यांनी बांधलेला ध्रुवस्तंभ !

  • सरकारने मंदिरांची पुर्न्उभारणी करण्याची मागणी

जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !

कुतुब मीनार परिसरात असलेली कुव्वत उल इस्लाम मशीद

नवी देहली – देहलीतील कुतुब मीनार परिसरात असलेली कुव्वत उल इस्लाम मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आलेली आहे. या संदर्भातील पुरावेही उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे पुन्हा मंदिरांची पुर्न्उभारणी करण्यात यावी, तसेच २५ देवतांची पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका येथील साकेत न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. पहिले जैन तीर्थंकर ऋषभ देव आणि भगवान विष्णु यांच्या नावाने पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. ८ डिसेंबरला यावर न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायाधिशांनी म्हटले, ‘याचिका पुष्कळ मोठी आहे. त्यामुळे त्यात देण्यात आलेल्या पुराव्यांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.’ यावर २४ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.


पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी युक्तीवाद करतांना मांडलेली आणि याचिकेतील सूत्रे

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

१. हिंदूंना इस्लामची शक्ती दाखवण्यासाठी मंदिर तोडून मशिदीची उभारणी

महंमद घोरीचा गुलाम असणार्‍या कुतुबुद्दीन याने देहलीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्याने सर्वप्रथम या २७ मंदिरांना तोडण्याचा आदेश दिला. तत्परतेने मंदिरे पाडून त्यातील साहित्याद्वारे मशीद उभारण्यात आली. मग तिला ‘कुव्वत-उल-इस्लाम’ (इस्लामची शक्ती) असे नाव देण्यात आले. ही मशीद बांधण्याचा उद्देश प्रार्थनेपेक्षा स्थानिक हिंदु आणि जैन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणे अन् त्यांच्यासमोर इस्लामच्या शक्तीचे प्रदर्शन करणे, हा होता.

२. मशिदीमध्ये हिंदूंच्या मंदिरांचे अवशेष आणि मूर्ती असल्याने नमाजपठण नाही !

कुतुबुद्दीन याने वर्ष ११९२ ही मशीद उभारली; मात्र मुसलमानांनी कधीही तेथे नमाजपठण केले नाही. याचे कारण होते की, मशिदीच्या बांधकामासाठी मंदिराचे खांब, भिंतीचा भाग आणि छताचा भाग यांचा वापर करण्यात आला होता अन् त्यावर हिंदु देवतांच्या मूर्ती होत्या. आजही या मशिदीवर मंदिराचा हा भाग पहायला मिळतो.

३. कुतुब मीनार नाही, तर ध्रुव किंवा मेरू स्तंभ !

आज ज्या ठिकाणाला महरौली म्हणून ओळले जाते. त्याचे पूर्वीचे मूळ नाव ‘मिहरावली’ आहे. हे स्थान ४ थ्या शतकातील राजा विक्रमादित्य याच्या नवरत्नांपैकी गणितज्ञ वराहमिहिर याने वसवले होते. त्यांनी ग्रहांच्या गतीचा अभ्यास करून विशाल स्तंभ बांधले, ज्याला ‘कुतुब मिनार’ म्हटले जाते. याला ‘ध्रुव स्तंभ’ किंवा ‘मेरू स्तंभ’ म्हटले जाते; मात्र मुसलमान आक्रमकांनी त्याला कुतुब मीनार असे नाव दिले.

४. पुरातत्व विभागाकडेही याचे पुरावे !

या परिसरात २७ नक्षत्रांचे प्रतीक असणारी २७ मंदिरे होती. जैन तीर्थंकरांसहित भगवान विष्णु, शिव, गणेश यांची मंदिरे होती. त्यांना तोडूनच मशीद बांधण्यात आली. पुरातत्व विभागाचे सर्वेक्षणही हेच सांगते की, येथे हिंदु आणि जैन मंदिरे तोडून मशीद बनवण्यात आली.

५. सरकारला इतिहास ठाऊक असूनही निष्क्रीय !

या मशिदीविषयी पूर्ण माहिती असतांनाही सरकारने हिंदु आणि जैन यांना त्यांचा पक्ष ठेवण्यास संधी दिली नाही. दुसरीकडे मुसलमानांनीही याचा वापर केला नाही. ही वक्फ बोर्डाचीही भूमी नाही. यावर कुणीही दावा करत नाही. सध्या ही जागा सरकारच्या नियंत्रणात आहे. सरकारने मंदिराचे पुनर्निर्माण करावे आणि त्यासाठी एका न्यासाची स्थापना करावी.