Karnataka Muslim Reservation Row : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मुसलमानांना आरक्षण दिल्याच्या सूत्रावरून संसदेत गदारोळ !

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि जे.पी. नड्डा व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

नवी देहली – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुसलमानांना आरक्षण दिल्याच्या सूत्रावरून २४ मार्चला राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर एकामागून एक आरोप केले. या आरोपांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यानंतरही संसदेत गोंधळ चालूच होता. यानंतर कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.


हे पण वाचा : D.K. Shivakumar On Muslim Reservation : (म्हणे) ‘मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत पालट करणार !’


१. सभागृहाचे कामकाज चालू होताच, सभापती जगदीप धनखड यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची संधी दिली. रिजिजू म्हणाले की, काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ज्यांच्याकडे घटनात्मक पद आहे, त्यांनी म्हटले आहे की, मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी पक्ष राज्यघटनेत पालट करील. ते म्हणाले की, धर्मावर आधारित आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत पालट करणे सहन केले जाऊ शकत नाही.

२. सभागृहाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आरोप केला की, काँग्रेस राज्यघटनेचे तुकडे करत आहे. भारतीय राज्यघटना बनवतांना डॉ. आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही. हे भारतीय राज्यघटनेचे एक स्वीकृत तत्व आहे.

३. कर्नाटक सरकारने सार्वजनिक कंत्राटांमध्ये अल्पसंख्यांकांना ४ टक्के आरक्षण दिले आहे.

संपादकीय भूमिका

धर्मावर आधारित आरक्षणाचे कोणतेच प्रावधान (तरतूद) राज्यघटनेत नाही, तरीही बहुमताचा अपलाभ उठवून राज्यघटनेलाही न जुमानणारी काँग्रेस देशाला कायद्याचे राज्य कधी देईल का ? मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी राज्यघटनेचा अवमान करणार्‍या काँग्रेसला लोकांनी घरची वाट दाखवणेच योग्य ठरेल !