‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासा’च्या निमित्ताने !
कोल्हापूर – महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे ‘धर्मवीर’ आहेत, ते गेली अनेक वर्षे धर्मकार्य करत आहेत; मात्र ते अप्रकाशित आहेत. अशांपैकीच कोल्हापूर येथील बिंदू चौकात गेल्या १९ वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती ‘धर्मवीर १४’ च्या माध्यमातून जतन करणारे आणि कोणतेही पाठबळ नसतांना मित्र परिवाराच्या सहकार्यातून धर्मकार्य करणारे वीर आहेत श्री. इंद्रजित तथा बॉबी राजेंद्र गायकवाड (वय ४० वर्षे) ! त्यांच्या या कार्यात त्यांना त्यांचे सहकारी सर्वश्री अमित शिंदे, प्रसाद खोराटे, आकाश गुरवळ, अनिकेत लांडगावकर यांच्यासह अनेक तरुणांचे पाठबळ मिळत आहे. सध्या धर्मवीर छत्रपती बलीदानमास चालू असून त्या निमित्ताने त्यांच्या संघटनेचा उद्देश आणि कार्य येथे देत आहोत.
वर्ष २००६ मध्ये बिंदू चौकात ‘धर्मवीर १४’चा ध्वज लावण्याची संकल्पना सुचणे आणि ती अविरतपणे चालू रहाणे !

श्री. इंद्रजित आणि त्यांचे कार्यकर्ते यांना वर्ष २००६ मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ‘धर्मवीर १४’ नावाचा ध्वज सिद्ध करून तो बिंदू चौकात लावण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी ती अमलात आणलीही. १४ मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असल्याने ध्वजावर तो दिनांक घालण्यात आला. श्री. इंद्रजित आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी असे ध्वज छत्रपती शिवाजी महाराज चौक यांसह आजूबाजूच्या गावांमध्ये, तसेच अन्यत्र असे ध्वज ५० हून अधिक ठिकाणी लावले आहेत. या माध्यमातून त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले आहे. हा ध्वज अयोध्या आणि कुंभमेळ्यातही फडकला आहे.
धर्मकार्यासाठी अंगावर खटले झेलणे आणि प्रसंगी कारागृहवास !
गेली १९ वर्षे धर्मकार्य करतांना श्री. इंद्रजित आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर अनेक वेळा खटले प्रविष्ट झाले, तर प्रसंगी कारागृहवासही पत्करावा लागला; मात्र प्रत्यक्षात तसे कोणतेही मोठे पाठबळ नसतांना केवळ धर्मकार्यात साथ देणार्या मित्रांच्या जोरावर श्री. इंद्रजित यांनी हे धर्मकार्य चालू ठेवले आहे. वर्ष २०१४ मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर नाटक बसवून ते सादर केल्याविषयी आणि त्यात कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवून पोलीस प्रशासनाने ते अन् त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. लवकरच याचा निकाल लागणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास, जयंती यांसह वर्षभर विविध उपक्रम !
श्री. इंद्रजित आणि त्यांचे सहकारी हे ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ पाळणे, १४ मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करणे, रक्तदान करणे यांसह वर्षभर विविध उपक्रम राबवतात. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होते, तिचे विशेष म्हणजे ‘शंभु प्रतिष्ठान’कडे छत्रपती संभाजी महाराज यांची २१ फुटी मूर्ती असून ते आणि त्यांचे सहकारी ही मूर्ती एका ट्रॉलीला रथासारखे सजवून ती ट्रॅक्टरचा वापर न करता दोरखंडाने हाताने ओढत बिंदू चौकात आणतात. बिंदू चौकातून परत शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन परत बिंदू चौक येथे फेरीची सांगता होते. श्री. इंद्रजित हे ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून हिंदु युवतींना वाचवणे यांसह ज्या ठिकाणी धर्मकार्यासाठी आवश्यक असेल, तिथे धावून जातात. श्री. इंद्रजित आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वर्षी ६ जानेवारीला रायगडावर जातात, तर ६ जूनला होणार्या राज्याभिषेक सोहळ्यात नियमित सहभागी असतात.