छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीचे दिले दाखले

पणजी, २३ मार्च (वार्ता.) – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यात राज्य नव्हते’, असे म्हणूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज गोव्यात रहात नसले, तरी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रांतात त्यांनी त्यांचे सुभेदार नेमले होते. यावरून गोव्यात शिवशाही हाती हे सिद्ध होते, अशी ठाम भूमिका इतिहासाचे प्राध्यापक प्रजल साखरदांडे यांनी मांडली आहे. ही माहिती देणारा त्यांचा व्हिडिओ शिवप्रेमींनी प्रसारमाध्यमात प्रसारित केला आहे.
व्हिडिओमध्ये प्रा. प्रजल साखरदांडे पुढे म्हणतात, ‘‘इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य होते, याचे पुरावे आढळत आहेत, तसेच त्यांनी नेमलेल्या सुभेदारांची नावेही इतिहासात उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वर्ष १६६८ मध्ये डिचोली तालुक्यात श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णाेद्वार केला. तसा शिलालेखही मंदिर परिसरात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे येथे राज्य नसते, तर त्यांनी मंदिराचा जीर्णाेद्वार केलाच नसता. वर्ष १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पेडणे, डिचोली, सांखळी आणि सत्तरी हे भाग आदिलशहाकडून कह्यात घेतले. ज्या ठिकाणी प्रांत कह्यात घेतले, तेथे छत्रपती शिवाजी महाराज सुभेदार नेमायचे. या सुभेदारांकडे महाराजांनी त्या त्या प्रांताचे दायित्व दिले होते. या सर्व गोष्टींमुळे गोव्यात शिवशाही होती हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे ‘गोव्यात शिवशाही नव्हती’, असे जो कोण म्हणतो ते चुकीचे आहे.’’