गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

पणजी, २३ मार्च (वार्ता.) – गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २६ मार्च या दिवशी दुपारी अर्थमंत्री या नात्याने राज्याचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २४ मार्च या दिवशी सकाळी ११.३० वाजता प्रश्नोत्तराच्या तासाने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर शून्यकाळ, लक्षवेधी सूचना आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर केवळ २४ मार्च आणि २५ मार्च, अशी २ दिवसच चर्चा होणार आहे. अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने या वेळी अर्थसंकल्पानंतर विशेष कामकाज होणार नाही. अधिवेशनाचा कालावधी अत्यल्प असल्यामुळे अनेक सरकारी विधेयके चर्चेविना संमत करावी लागणार आहेत. या अधिवेशनात १८० तारांकित आणि ५४८ अतारांकित प्रश्न विचारण्यात आले आहेत. विद्यापिठातील प्रश्नपत्रिका चोरीचे प्रकरण, मडगाव येथील बलात्कार प्रकरण, पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी श्री देव खाप्रेश्वर मंदिर मोडणे, नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळणे, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, वाढते अपघात, भ्रष्टाचाराचा आरोप झालेली प्रकरणे आदीं विषयांवर चर्चा होणार आहे आणि या वेळी सरकारची कसोटी लागणार आहे. सरकारला कोडींत पकडतांना विरोधी पक्षांचीही कसोटी लागणार आहे.

अर्थसंकल्प पर्यटन आणि रोजगार क्षेत्रांवर भर देणारा असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सुतोवाच

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – आगामी अर्थसंकल्प हा पर्यटन आणि रोजगार या क्षेत्रांवर भर देणारा असेल, असे सुतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पाविषयी आताच अधिक काही बोलणार नाही; मात्र गोव्याच्या पर्यटनाला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रयत्न आहे. पर्यटनातून रोजगाराची अधिकाधिक संधी गोमंतकीय युवकांना प्राप्त व्हावी, हे आपले उद्दिष्ट आहे. अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना प्रोत्साहन अन् प्राधान्य देणारा आहे; मात्र पर्यटन क्षेत्रासाठी अजूनही बरेच काम करायचे आहे.’’