Bangladesh Garment Industry : गेल्या ७ महिन्यांत १४० कापड कारखाने बंद, तर १ लाख लोक बेरोजगार !

  • बांगलादेशातील अराजकतेचे दिसू लागले दुष्परिणाम !

  • आस्थापनांचे मालक देश सोडून जाऊ लागले !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावल्यानंतर चालू झालेल्या अराजकतेचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या वस्त्रोद्योगावर संकट आले आहे. कपडे निर्यातीत मोठा सहभाग असलेल्या बांगलादेशात गेल्या ७ महिन्यांत १४० हून अधिक कापड कारखाने बंद पडले आहेत. यामुळे एक लाखाहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. गाजीपूर, सावर, नारायणगंज आणि नरसिंदी येथे ५० हून अधिक कारखाने पूर्णपणे बंद पडले आहेत, तर अनुमाने ४० कारखाने तात्पुरते बंद आहेत. ईदनंतर आणखी कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. काही कापड आस्थापनांकडून कामगारांचे वेतन २ ते १४ महिन्यांपासून देण्यात आलेले नसल्याने कामगारांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे.

१. कारखाने बंद होत असल्याने २० टक्के मागणी अन्य देशांकडे गेली आहे. यात भारत, व्हिएतनाम, श्रीलंका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.

२. कपड्यांचे कारखाने अचानक बंद होण्याची कारणे म्हणजे आर्थिक मंदी आणि राजकीय अस्थिरता. बंद पडणारे बहुतेक कारखाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगशी संबंधित नेत्यांचे आहेत. यामध्ये हसीना यांचे परकीय गुंतवणूक सल्लागार सलमान एफ्. यांचाही समावेश आहे.

३. कामगार नेते महंमद मिंटू यांनी सांगितले की, ‘बेक्सिमको’ हे वस्त्र क्षेत्रातील एक महाकाय आस्थापन होते. ते बंद पडल्याने समस्या निर्माण होत आहे.

४. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मोठे कापड व्यापारी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे कारखाने बंद पडण्याची समस्या अधिक गंभीर बनली आहे.

५. कापड कारखाने बंद होण्याच्या संदर्भात सरकारने दावा केला आहे की, बाजारात मागणी नसल्यामुळे उत्पादन थांबले आहे; मात्र ‘गारमेंट वर्कर्स ट्रेड युनियन सेंटर’चे कायदेशीर व्यवहार सचिव खैरुल मामुन मिंटू यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मागणी मिळत आहे; परंतु जे कारखाने शिल्लक आहेत, त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे.

८४ टक्के परकीय चलन देणारा वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योग प्रतिवर्षी देशाच्या ८४ टक्के परकीय चलनाची कमाई करतो. तसेच ५० लाख लोकांना थेट आणि दीड कोटी लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार प्रदान करतो. विशेष म्हणजे या उद्योगात महिलांचा मोठा सहभाग आहे.

सैन्याकडून शेख हसीना यांना पुन्हा सत्तेवर बसण्याचा विरोधकांचा दावा सैन्याने फेटाळला

बांगलादेशामध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नवीन पक्ष ‘नॅशनल सिटीझन पार्टी’ आणि सैन्य यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या पक्षाचे नेते हसनत अब्दुल्ला आणि सर्गिस आलम यांनी दावा केला की, सैन्य अवामी लीगचे नाव पालटून एक नवीन पक्ष स्थापन करू शकते जेणेकरून हसीना यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात पुन्हा प्रवेश करता येईल. तथापि, सैन्याने हा दावा फेटाळतांना म्हटले की, आमची अशी कोणतीही योजना नाही.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील वस्त्रोद्योग हा ८४ टक्के परकीय चलन देशात आणतो, आता तोच जर डबघाईला जात असेल, तर बांगलादेशाची स्थिती पाकिस्तानप्रमाणे होणार, हे स्पष्ट दिसत आहे. बांगलादेशालाही पुढे पाकप्रमाणे जगापुढे भीक मागावी लागणार, हे कुणी थांबवू शकत नाही !