वेताळबांबर्डे ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन
कुडाळ – तालुक्यातील वेताळबांबर्डे येथे चालू असलेले अवैध मद्यविक्री, मटका, अमली पदार्थांची विक्री अशा सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ यांनी पाेलीस प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी याविषयी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी ग्रामस्थानी दिली आहे.
कुडाळ पोलीस ठाण्यात आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची वेताळबांबर्डे ग्रामस्थांनी भेट घेतली आणि गावात चालू असलेल्या अवैध व्यवसायांच्या विषयी माहिती दिली अन् अशा व्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.
गावातील मद्यासह अन्य अवैध व्यवसायांच्या विरोधात कारवाईसाठी यापूर्वीच ग्रामपंचायतीने पोलिसांना पत्र दिलेले आहे; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही पोलीस कर्मचारी अवैध व्यवसाय करणार्यांना पाठीशी घालत आहेत का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. गावात श्री देव वेतोबा मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावात मांसाहाराचे सेवन आणि विक्री यांवर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन बंदी घातली आहे. वेताळबांबर्डे पुलाखाली मध्यरात्रीच्या वेळी एक महिला अमली पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसायांच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी अन्यथा ग्रामस्थांचा संयम सुटू शकतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी बोलतांना कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की, पोलीस कोणत्याही अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देत नाही किंवा पाठीशी घालत नाही. आताही ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार लक्ष ठेवून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करू.
या वेळी सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, साजूराम नाईक, अवधूत नाईक, शैलेश घाटकर, स्नेहा दळवी, दिलीप तिवरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.