आदिवासी गरोदर महिला आणि बालके यांचे कुपोषण शून्यावर आणण्याचे प्रयत्न ! – महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे

अदिती तटकरे

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’तून आदिवासी क्षेत्रांतील गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना चौरस आहार प्रतिदिन देण्यात येतो. ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांनाही आहार देण्यात येतो. त्यातून कुपोषण अल्प होत आहे. ते शून्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे. इतर जिल्ह्यांतील गरोदर आणि स्तनदा मातांना असाच आहार देण्याचा सरकार विचार करील, अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये दिली. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, या महिलांना २ प्रकारचा आहार दिला जातो. सुका आणि गरम आहार दिला जातो. जो सुका आहार दिला जातो, त्याची प्रत्येक महिन्याला पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून केली जाते. ज्या आहारामध्ये निकृष्ट दर्जा आढळतो, तो त्याक्षणी पालटण्यात येतो.

केंद्राच्या ‘एकात्मिक बालविकास सेवा योजने’च्या द्वारे योजना राबवली जाते. त्याचे दर हे केंद्राने निश्चित केले आहेत. त्या दरांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.