मराठीप्रेमींचा ३१ मार्चला ‘निर्धार मेळावा’

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी रणशिंग फुंकणार !

पणजी, २३ मार्च (वार्ता.) – अभिजात मराठी भाषेला गोव्यात राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी निर्णायक लढा देणार्‍या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ने ३१ मार्च या दिवशी मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक ‘निर्धार मेळावा’ घेण्याचे निश्चित केले आहे. गोमंतक मराठी अकादमीच्या पर्वरी येथील मराठी भवन सभागृहात निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू समितीच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील मराठी राजभाषा आंदोलनाचे अध्वर्यू गो.रा. ढवळीकर यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ, ‘मराठी मायबाेली’ गटाचे प्रकाश भगत आदींचीही उपस्थिती होती.

पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात हा ‘निर्धार मेळावा’ घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात राज्यातील सर्व १२ तालुक्यांतील २० प्रखंडांतून प्रातिनिधिक स्वरूपात कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. ‘निर्धार मेळाव्या’च्या पूर्वसिद्धतेसाठी सर्व प्रखंडांतील मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचे गट निश्चित करून प्रखंडस्थानी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. याविषयी १० सहस्र आवाहन पत्रकांचे वितरण पहिल्या टप्प्यात करण्याचे ठरले आहे.