BSNL 5G Network Launch : ‘बी.एस्.एन्.एल्.’ लवकरच ‘५ जी’चे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणार !

‘४ जी’ तंत्रज्ञान विकसित करणार्‍या जगातील ५ देशांमध्ये भारताचा समावेश

दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

नवी देहली – ‘बी.एस्.एन्.एल्.’, म्हणजेच ‘भारत संचार निगम लिमिटेड’ हे सरकारी आस्थापन ‘४ जी’ नेटवर्कला जून २०२५ पर्यंत सर्वत्र पोचवणार आहे. त्यानंतर लगेचच ते ‘५ जी नेटवर्क’चे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करेल, अशी माहिती दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. ‘बी.एस्.एन्.एल्.’ला ५ जी नेटवर्कच्या सेवेअभावी खासगी दूरसंचार आस्थापनांशी स्पर्धा करणे अवघड जात आहे. प्रत्येक टेलिकॉम आस्थापन त्याचे नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असते. या स्पर्धेत आता ‘बी.एस्.एन्.एल्.’ नेही वेग पकडला आहे. ‘बी.एस्.एन्.एल्.’ नेे ४ जी नेटवर्कसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

१. दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, स्वत:चे ४ जी तंत्रज्ञान विकसित करणार्‍या जगातील ५ देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. हे कौशल्य ५ जीपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

२. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत ‘बी.एस्.एन्.एल्.’ ला अनुमाने २६२ कोटी रुपयांचा निवळ नफा झाला आहे. जवळपास १७ वर्षांनंतर ‘बी.एस्.एन्.एल्.’ला हा नफा झाला आहे. गेल्या काही महिन्यांत ‘बी.एस्.एन्.एल्.’ने काही नवीन सेवा चालू केल्या आहेत.