मौजे कासवान (छत्रपती संभाजीनगर) येथे अंदाजे ३५ ब्रास अवैध वाळू साठा जप्त !

विधान परिषद कामकाज तारांकित प्रश्न

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), मौजे पाडळी येथील ग.नं. १४४ मधून अवैधरित्या मुरूम उत्खनन आणि वाहतूक करतांना आढळून आलेला ३ हायवा अन् १ जेसीबी यांच्यावर १६ जानेवारीला दंडात्मक कारवाई करून १३ लाख ५० सहस्र वसूल करण्यात आले आहेत. अवैध वाहतूक प्रकरणामध्ये तहसीलदार, पैठण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीत १२५.३९ ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात येवून लिलावाअंती १ लाख ५५ सहस्र रुपये शासन जमा केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे केलेल्या दौर्‍याच्या पहाणीत मौजे कासवान येथे अंदाजे ३५ ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे.

पैठण तालुक्यात २८ विटभट्ट्यांच्या ठिकाणी आढळून आलेल्या अवैध मातीच्या ढिगार्‍याच्या अनुषंगाने संबंधित वीटभट्टीधारकांना रितसर नोटीस बजावली आहे, तसेच ५ लाख ५२ सहस्र रुपये दंडात्मक रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नांमध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या होणार्‍या वाळू उपसाविषयी अंबादास दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सदर माहिती दिली.