
धाराशिव – धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूरसह पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थस्थळांचा समावेश असलेला धार्मिक कॉरिडॉर (सुसज्ज महामार्ग) विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. तुळजापूर पुनर्विकास आणि तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील, धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
तुळजापूर पुनर्विकास आराखड्यामुळे मंदिर परिसराच्या विकासासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला गती मिळेल. हे धार्मिक कॉरिडॉर उभारल्यास भाविकांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध होतील आणि या तीर्थस्थळांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळेल, असेही उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले, तसेच काही सूचनाही केल्या. तुळजापूर मंदिर परिसर संवर्धनासाठी ५८ कोटी ११ लाख रुपयांची विकासकामे चालू असल्याचे पुरातत्व विभाग संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.
पुढील टप्प्यात मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवून कुंडांचे सौंदर्यीकरण आणि मंदिर संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि २ वर्षांत संपूर्ण विकास आराखड्याची पूर्तता होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीत डॉ. नीलम गोर्हे यांनी पुढील सूचना केल्या.
१. शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मातेच्या ऑनलाईन दर्शनाची सोय दूरचित्र वाहिनीद्वारे करून देण्यात यावी.
२. तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास करतांना भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करावे.
३. रुग्णवाहिका, अग्नीशमन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा सिद्ध करावा, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि िवद्युत् वितरण व्यवस्थेचा समावेश करावा.
४. जोगते, भोपे, भुते आणि कडकलक्ष्मी या पारंपरिक भक्तांसाठी स्वतंत्र भक्त निवास तयार करावे.
५. देवीच्या साड्या, दागिने आणि दानातील वस्तू यांची मोजणी सुयोग्य पद्धतीने व्हावी.