सावंतवाडी – शहरात ‘व्हिडिओ गेम’च्या नावाखाली जुगार खेळला जाणार्या ‘विराज व्हिडिओ गेम पार्लर’वर पोलिसांनी २२ मार्च या दिवशी सायंकाळी कारवाई केली. या प्रकरणी कह्यात घेतलेल्या ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद (दाखल) करण्यात आला आहे, तसेच पोलिसांनी ‘व्हिडिओ गेम’ खेळण्याची ८ यंत्रे कह्यात घेतली.
दर्शन सीताराम वाडकर (समाजमंदिर, सावंतवाडी), रॉजर जॉन डिसोझा (जिमखाना, सावंतवाडी) आणि सुभाष श्रीधर भोसले (कणकवली) अशी संशयितांची नावे आहेत. या ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
कुडाळ शहरातही एका ‘व्हिडिओ गेम पार्लर’वर पोलिसांनी धाड टाकून ३ यंत्रे कह्यात घेण्याची घटना नुकतीच घडली असतांना आता सावंतवाडीतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगारांचे अड्डे चालवले जात आहेत, हे स्पष्ट होत आहे. अवैध मद्याची वाहतूक आणि विक्री, अमली पदार्थांची विक्री यांसह आता ‘व्हिडिओ गेम’च्या नावाखाली वाढत चाललेले जुगाराचे अड्डे हे जिल्ह्याच्या भावी पिढीच्या दृष्टीने धोका बनले आहेत.