प्रेमभाव, साधनेतील सातत्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या पुणे येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७५ वर्षे) !

कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (२८.११.२०२०) या दिवशी पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. निरागसता

‘आईंचे हसणे एखाद्या लहान बाळासारखे आहे.’ – सौ. मेधा गोखले (सून)

२. प्रेमभाव 

अ. ‘आई तिच्यासमोर जी व्यक्ती येते, तिच्यावर भरभरून प्रेम करते. आतापर्यंत आईचे कधीही कुणाशी भांडण झाल्याचे मी पाहिले नाही. तिचे सर्वांवर निरपेक्ष प्रेम आहे.’ – श्री. पराग गोखले (मुलगा)

आ. ‘आजीच्या मनात सर्वांविषयी प्रेमभाव असतो. प्रेमभाव तिचा स्थायीभावच आहे. तिच्या मनात नातेवाईक किंवा साधक या कुणाविषयी जराही पूर्वग्रह नाही. ती प्रत्येकाची तेवढ्याच मायेने आणि आपुलकीने विचारपूस करते. तिच्याशी कुणी कितीही वाईट वागले, तरी ती त्यांच्याशी चांगलीच वागते. ती तिचा प्रेमभाव कुठेच उणा पडू देत नाही.

३. माझी आजी मला मैत्रिणीसारखी आहे. मी तिला मनातील सगळे विचार सांगते.

४. साधनेतील सातत्य 

अ. पहाटे ४ – ५ वाजता उठून प्रातःस्मरण, मानसपूजा, सूक्ष्मातून गुरुदेवांच्या खोलीत जाऊन ‘त्यांना काय हवे-नको ते पहाणे’, हे तिचे प्रतिदिन चालू असते.

आ. ती वर्ष २००३ पासून आजपर्यंत नियमित सारणी-लिखाण करत आहे. यामध्ये कधीच खंड पडलेला नाही.

इ. आजी सर्वच गोष्टी नियमित करते, उदा. आढावा पाठवणे, रात्री झोपतांना सूक्ष्मातून गुरुदेवांचे पाय चेपून देणे, सूक्ष्मातून त्यांचे अंथरूण घालणे, आवरण काढणे इत्यादी.’ – कु. मधुरा गोखले (नात)

ई. ‘आईचे साधनेतील सातत्य वाखाणण्यासारखे आहे. काही दिवसांपूर्वी ती रुग्णाईत असल्याने तिला रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा तेथेही तिचे ‘सूचनासत्र करणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे’, हे प्रयत्न सतत चालू असायचे.’ – श्री. पराग गोखले

५. साधनेची तळमळ

‘एकदा मी तिला विचारले, ‘‘आजी, तुझे दिवसभरात १० भावजागृतीचे प्रयत्न, १० – १५ सूचनासत्रे, सगळे उपाय आणि ५ – ६ वेळा आवरण काढणे, हे सगळेच नियमित कसे होते ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी अजून अल्पच पडते. माझ्याकडून गुरुदेवांना जेवढे अपेक्षित आहे, तेवढे काहीच होत नाही.’’

६. आज्ञापालन

परात्पर गुरुदेवांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे ती काटेकोरपणे आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करते.’ – कु. मधुरा गोखले

७. भाव

अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ २४ घंटे आईंच्या जवळ असतो. आई प्रतिदिन रात्री झोपतांना ग्रंथातील प्रत्येक संतांच्या चित्रातील त्यांच्या चरणांना नमस्कार करतात आणि नंतरच झोपतात.

आ. आम्ही कुठे बाहेर गेलो आणि ‘आम्हाला साधक भेटले’, असे त्यांना घरी आल्यानंतर सांगितले, तर त्यांना स्वतःलाच संत किंवा साधक भेटल्याचा आनंद होतो. आम्ही सत्संगातील सूत्रे सांगितली की, त्यांना पुष्कळ आनंद होतो. त्या कानात जीव आणून ती सूत्रे ऐकत असतात.

इ. ‘आईंना संत घोषित करण्याचा कार्यक्रम आहे’, याचा निरोप आम्हाला १ दिवस आधी मिळाला होता. तेव्हा ‘आमच्या घरी असलेले पायथळ सद्गुरु स्वाती खाडयेताईंसाठी आणायचे आहे’, असा निरोप आम्हाला मिळाला. तेव्हा पू. आई मला म्हणाल्या, ‘‘त्या पायथळाच्या ठिकाणी मीच असते, तर बरे झाले असते.’’- सौ. मेधा गोखले

ई. ‘तिची गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भाव पाहून माझी भावजागृती होते.

८. पू. आजींमध्ये जाणवलेले पालट

अ. तिची त्वचा पुष्कळच मऊ आणि गुळगुळीत झाली आहे.

आ. तिचा तोंडवळा उजळला आहे. ती तेजस्वी दिसते.

इ. तिचे बोलणे ऐकतांना गुरुदेवच बोलत असल्यासारखे वाटते.’ – कु. मधुरा गोखले

९. पू. आजींप्रती त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

अ. ‘आईसाठी पुढील काव्यपंक्ती तंतोतंत लागू पडतात,

आई माझा गुरु, आई कल्पतरु, सौख्याचा सागरु आई माझी ।
प्रीतीचे माहेर, अमृताची धार,  मांगल्याचे सार आई माझी ॥’

– श्री. पराग गोखले (मुलगा)

आ. ‘मला पू. आईंची सेवा सतत करायला मिळते’, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ – सौ. मेधा गोखले

इ. ‘आज कितीतरी मुले अशी आहेत की, ज्यांना आजी-आजोबांचे प्रेम ठाऊक नसते. माझी आजी २४ घंटे माझ्या समवेत असते. मला तिचे प्रेम अनुभवायला मिळते. ‘गुरुदेवांनी मला अशी आजी दिली’, यासाठी मी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.’ – कु. मधुरा गोखले (१.८.२०१८)

पू. गोखलेआजी संत होण्याच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना 

१. ‘आई लवकरच संत होतील’, असे मला प्रतिदिन वाटत होते. त्या संत होण्यापूर्वी ४ – ५ दिवस मला पुष्कळ आनंद जाणवत होता.’ – सौ. मेधा गोखले (सून)

२. पू. आजी रुग्णाईत असतांना त्यांची सेवा करतांना ‘संतांचीच सेवा करत आहोत’, असे वाटणे : ती काही दिवस रुग्णाईत असल्याने झोपूनच होती. आम्ही तिला जेवण द्यायचो, तेव्हा ती म्हणायची, ‘‘मी आजारी पडल्यामुळे तुम्हाला माझी सेवा करावी लागते.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार येऊन गेला, ‘त्यात काय एवढे ? मी संतांचीच सेवा करत आहे ना ? यात माझी साधनाच होत आहे.’ तेव्हा मला ‘मी संतांचीच सेवा करत आहे’, असे मला वाटत होते.’ – कु. मधुरा गोखले (नात) (१.८.२०१८)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक