(म्हणे) ‘भारताने चिनी अ‍ॅप्सवर घातलेली बंदी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी !’ – चीनचा आरोप

  • अ‍ॅप्सच्या नावाखाली भारतियांच्या माहितीची चोरी करणारा, भारतावर लक्ष ठेवणारा चीन कोणत्या नियमांचे पालन करत आहे ? हे त्याने सांगायला हवे !
  • भारताच्या सुरक्षेच्या मुळावर येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे, हे चीनने नेहमीच लक्षात ठेवावे !

बीजिंग (चीन) – भारताने केलेली चिनी अ‍ॅप्सवरील बंदी ही जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण केला जात असून चीन याचा विरोध करत आहे. आशा आहे की, भारत त्याच्या बाजारपेठेत सर्वांना निःपक्षपातीपणे व्यवसाय करू देईल आणि भेदभाव करणार नाही, अशा शब्दांत चीनने त्याच्या ४३ अ‍ॅप्सवर भारताने घातलेल्या बंदीचा विरोध केला आहे. भारताने गेल्या काही मासांत एकूण २६८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

चीनच्या प्रवक्त्या जी रोंग यांनी भारताच्या निर्णयाचा विरोध करतांना म्हटले की, चिनी आस्थापने या आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि देशांमधील इतर नियमांचे, तसेच कायद्याचे पालन करूनच व्यवसाय करतात. चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांसाठी विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत. दोन्ही देशांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारी संबंध पूर्वीप्रमाणे सामान्य होतील अन् दोन्ही देशांना त्याचा लाभ होईल.