भारतासमवेत चीनचेही नाव
नवी देहली – अमेरिकेच्या सरकारने नुकताच वर्ष २०२५ साठीचा वार्षिक धोक्याचे मूल्यांकन करणारा अहवाल सादर केला आहे. अमेरिकेला जागतिक स्तरावर वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून असलेल्या धोक्यांचा आढावा घेण्याचे काम या अहवालातून केले जाते. या अहवालामध्ये अमेरिकेत उद्भवलेल्या ‘फँटानाईल’ या अमली पदार्थाच्या आव्हानासाठी भारत आणि चीन या देशांना उत्तरदायी धरण्यात आले आहे.
१. या अहवालानुसार अमेरिकेत फँटानाईलसाठी लागणार्या घटकांची तस्करी केली जात असून त्यात प्रामुख्याने भारत आणि चीन यांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर फँटानाईलचे उत्पादन होऊ लागले आहे.
२. गेल्या वर्षभरात अमेरिकेत ५२ सहस्र अमेरिकी नागरिकांचा अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू झाला आहे.
३. वॉशिंग्टनमध्ये नुकतेच अमली पदार्थांशी निगडित एका प्रकरणात भारतातील आस्थापन आणि तिचे ३ अधिकारी यांच्यावर अमेरिकेत बेकायदेशीररित्या फँटानाईलचे घटक आयात केल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
४. गेल्या आठवड्यात याच प्रकरणात न्यूयॉर्कमधून भाग्यनगरमधल्या एका आस्थापनाच्या २ उच्चपदस्थ अधिकार्यांनाही अटक करण्यात आली होती. या आधारावर या अहवालात भारताचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.