साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

साधनेत कर्मफल सिद्धांताचा उपयोग करून साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. ‘देव आपल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत आहे’, या कर्मफलाच्या सिद्धांतावर ‘ध्वनीचित्रीकरण चालू आहे’ हे सूत्र आधारित असणे

अ. ‘प्रत्येक कर्माला फळ आहे’, असे कर्माचा सिद्धांत सांगतो. चांगल्या कर्माने पुण्य लाभते, तर वाईट कर्माने पाप लागते.

आ. जीव कर्म केल्याविना जगू शकत नाही. त्यामुळे कर्मफलाचा काटा अखंड फिरतच रहातो. कर्मफलात केवळ कृतीच नाही, तर विचारही जमा होतात.

इ. आपण केलेल्या अयोग्य कृती, अयोग्य विचार आणि अयोग्य प्रतिक्रिया या सर्व संचितात जमा होतात, उदा. एखाद्याविषयी राग, द्वेष, पूर्वग्रह किंवा कोणतेही वाईट विचार; तसेच ‘इतरांना वाईट वाटेल’, असे बोलणे, अपमानास्पद बोलणे, टोमणे मारणे इत्यादी प्रकारचे बोलणे झाले की, देव त्याची लगेच नोंद करतो. तो आपल्या प्रत्येक गोष्टीची कर्मफलाच्या सिद्धांतानुसार संचितात नोंद करतो, म्हणजे एक प्रकारे आपल्या प्रत्येक गोष्टीचे देव ‘ध्वनीचित्रीकरण’ करत असतो.

ई. आपण साधनेमध्ये आलो आहोत, तर आपल्याला पाप करायचे नाही आणि पुण्यही करायचे नाही. आपल्याला पाप-पुण्याच्या पलीकडे असलेली निवळ साधना करायची आहे.

उ. हे सूत्र लक्षात घेतल्यास साधना करतांना चुका अल्प होणे, साधकत्व निर्माण होणे आणि भाववृद्धीचे प्रयत्न करणे, असे लाभ होतात.

२. पाप-पुण्य भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागू नये, यासाठी प्रत्येक कर्म साधना म्हणूनच झाले पाहिजे !

२ अ. कर्म सिद्धांत : भावनेपोटी केलेली चांगली कृती पुण्याच्या खात्यात जमा होते, तर द्वेषापोटी घडलेली वाईट कृती पापाच्या खात्यात जमा होते. ‘पाप-पुण्य भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो’, हा कर्माचा सिद्धांत आहे.

२ आ. प्रत्येक कर्म म्हणजे साधना व्हायला हवी ! : संचितामध्ये केवळ वाईटच नाही, तर चांगले कर्मही अंतर्भूत असते. हे टाळण्यासाठी कर्म चांगलेही नको आणि वाईटही नको. तसेच कर्म साधना म्हणून न झाल्याने संचित किती साठत जात आहे, हे आपल्याला कळतच नाही; म्हणूनच प्रत्येक कर्म साधना म्हणूनच झाले पाहिजे.

३. मोक्षप्राप्तीकडे जाण्यासाठी पाप-पुण्याचा हिशोब संपवणे, याविना अन्य पर्याय नाही !

अ. साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यासाठी सारणी लिहितात. या सारणीमध्ये साधकांद्वारे सर्वसाधारणपणे ४ – ५ प्रसंग लिहिले जातात. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधक कृती आणि मन यांच्या स्तरावरील कितीतरी चुका लिहू शकत नाहीत. मनामध्ये येणारे अयोग्य विचार, प्रतिक्रिया आणि अयोग्य कृती लक्षात आल्या, तरी बरेच साधक त्या सारणीत लिहित नाहीत.

आ. साधकांनी सर्व सूत्रे सारणीत लिहिली किंवा नाही लिहिली, तरी देव सर्व सूत्रांची इत्यंभूत माहिती प्रत्येकाच्या खात्यात लिहित असतो. तो प्रत्येकाचा प्रत्येक विचार आणि कृती कालावधीसहित लिहित असतो अन् कर्मफलानुसार त्याचे त्याला फळही देतो.

इ. आपण मोक्षप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करत आहोत. मोक्षप्राप्तीच्या वाटेवरून जातांना आपले संचित वाढत राहिले, तर आपल्याला मोक्षप्राप्ती लवकर कशी काय होणार ? म्हणूनच पाप-पुण्याचा हिशोब संपल्याविना आपल्याला दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठी पुष्कळ वेळही लागेल. सर्व देवाण-घेवाण हिशोब पूर्ण झाल्यावर, आपले सर्व देह शुद्ध झाल्यावरच ते शक्य होईल.

४. भगवंताचे नोंद ठेवणे (ध्वनीचित्रीकरण) अखंड चालू असतांना आपल्याकडून पाप-पुण्य घडत राहिले, तर आपण मोक्षापर्यंत पोचणार कधी ?

भगवंताचा ध्वनीमुद्रक इतका शक्तीशाली आहे की, तो सूक्ष्मातीसूक्ष्म ग्रहण करत असल्याने त्याच्या ध्वनीमुद्रकात केवळ मनातल्या मनात बोलले किंवा विचार आला, तरी तो मुद्रित होते. देव म्हणतो, ‘तुम्ही कृती अंधारात करता कि उजेडात करता ! माझा छायाचित्रक (कॅमेरा) इतका शक्तीमान (पॉवरफुल) आहे की, त्याच्यातून काहीच लपू शकत नाही. मी अखंड चित्रीकरण करतच असतो, म्हणजे या सर्वांची नोंद मी ठेवतच असतो. नंतर हे सगळे मी चित्रगुप्ताला देतो. तो पाप-पुण्याचा सर्व हिशोब करतो. माझ्यात दुजाभाव (पार्शालीटी) किंवा भावनाशीलता नसते.’ आता भगवंताचे हे नोंद ठेवणे (ध्वनीचित्रीकरण) अखंड चालू असेल आणि आपल्याकडून पाप-पुण्य घडत राहिले, तर आपण मोक्षापर्यंत पोचणार कधी ? ही प्रक्रिया कुठेतरी खंडित होणे आवश्यक आहे.

५. ‘देव माझे सतत ध्वनीचित्रीकरण करत आहे’, या जाणीवेची आवश्यकता !

ही प्रक्रिया कुठेतरी खंडित होण्यासाठी आपण सतत ‘देव माझे सतत ध्वनीचित्रीकरण करत आहे’, याची जाणीव ठेवायची आहे. या जाणिवेमुळे साधकाचे मनाकडे लक्ष वाढत जाते. मनात चुकीचा किंवा वाईट विचार जरी आला, तरी ‘याचे ‘रेकॉर्डिंग’ झाले ! या क्षणी देवाने दिलेली साधनेची संधी गेली’, असे समजावे. ही प्रक्रिया बाणासारखी आहे. भात्यातून एकदा सुटलेला बाण परत येत नाही, तसे एकदा येऊन गेलेला विचार किंवा केलेली कृती भगवंताकडे मुद्रित झाल्यावर ती पुन्हा खोडता येत नाही किंवा पालटता येत नाही. भगवंताचे हे ध्वनीचित्रीकरण कुणीच थांबवू शकत नाही.

६. भगवंताच्या ध्वनीचित्रीकरण प्रकियेतून बाहेर पडण्याचे मार्ग

अ. मनात अयोग्य विचार आला की, देवाची आणि ज्याच्याविषयी अयोग्य विचार आला, त्याची मानस क्षमायाचना करणे

आ. ‘तो अयोग्य विचार लहान आहे, थोड्या वेळासाठी आला होता’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची नोंद घेणे

इ. अयोग्य विचार, कृती सर्व सारणीमध्ये लिहिणे (आवश्यकतेनुसार फलकावर लिहिणे), व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगणे, प्रायश्‍चित घेणे, पुष्कळ लहान चूक असेल, तर क्षमायाचना करणे

ई. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना वाटेल, ‘आमच्या मनात अनेक अनावश्यक आणि नकारात्मक विचार येत असतात. तसेच विकल्पही येत असतात. अशा वेळी आम्ही कसे असावे ?’ येथे लक्षात ठेवूया की, ‘येणारे असे विचार तुमचे आहेत कि मोठ्या अनिष्ट शक्तींचे आहेत’, हे त्या सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ भगवंताला कळते. त्यासाठी अनिष्ट शक्तींच्या विचाराची काळजी करू नका. तुमचे विचार तुम्ही शोधून, ते विचार निर्माण करणारे स्वभावदोष आणि अहंची केंद्रे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा !

ए. चूक झाल्यावर पश्‍चात्ताप वाटला पाहिजे. तसे वाटल्यास पापक्षालन होऊ शकते; कारण पश्‍चात्तापाने पाप जळून नष्ट होते. भगवंताने अशा प्रकारची संधी दिली आहे. समजा तुम्ही मोठी चूक केली आणि लहानसे प्रायश्‍चित घेतले, तर थोडीशीच चूक पुसली जाईल.

ऐ. सतत भावाच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न वाढवणे; कारण भावाच्या स्थितीत अनेक जन्माचे प्रारब्ध नष्ट होते. यामुळे भगवंत आपल्याला क्षमा करील; मात्र यापैकी काहीच केले नाही, तर ती चूक भगवंत खोडू शकत नाही.

७. गुरुकृपायोगानुसार साधनेत स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन यांच्या प्रक्रियेला ६० टक्के महत्त्व असण्याचे कारण

माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणार्‍या जिवांची त्यांचे प्रारब्ध आणि संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे साधकाच्या प्रगतीची (आध्यात्मिक उन्नतीची) गती मंदावते. यावरून ‘गुरुकृपायोग साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन यांच्या प्रक्रियेला ६० टक्के महत्त्व का आहे’, हे लक्षात येते.

८. पुण्य तारक नाही आणि पाप मारक नाही, तर भाव तारक आहे !

अ. संत ज्ञानेश्‍वरांनी एका ओवीत म्हटले आहे की,

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे ।
मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥

– श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय ९, ओवी ३१६

अर्थ : पुण्यात्मक पापाने स्वर्गप्राप्ती होते. पापाने व्यक्ती नरकात जाते. शुद्ध पुण्याने, म्हणजे निष्काम भक्तीने माझी (भगवंताची) प्राप्ती होते.

स्वर्गप्राप्ती हा साधकाचा उद्देश नसल्याने स्वर्गप्राप्ती करून देणार्‍या पुण्यालाही पापच म्हटले आहे. साधकाचा उद्देश मोक्षप्राप्ती हाच असतो.

आ. ‘स्वर्गात नेणार्‍या पुण्यालासुद्धा पापच म्हटले आहे; कारण ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घायला लागतो. तसेच संतांनी म्हटले आहे, ‘पुण्य तारक नाही आणि पाप मारक नाही, तर भाव तारक आहे.’ पाप आणि पुण्य या कल्पना आहेत; भाव मात्र कल्पना नसून वस्तूस्थिती आहे. वस्तू म्हणजे ब्रह्म ! भाव ब्रह्मस्वरूप आहे.’ (संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ – भावजागृतीसाठी साधना, पृष्ठ १६)

यावरून साधकाचा साधना प्रवास पाप-पुण्याच्या पलीकडचा आहे. साधकांना पाप आणि पुण्य दोन्हीही नको !

९. साधकांनो, साधनेत आपल्याला वेगाने पुढे जाण्याची वेळ आली  असल्याने सतत भावाच्या स्तरावर रहा !

‘आपल्याकडे देव बघत आहे’, हे आपल्याला ठाऊक असते; मात्र तो केवळ पहात नाही, तर तो कृती, विचार आणि अंतर्मनातील सूक्ष्म विचार यांचेही ध्वनीचित्रीकरण करतोे. बाह्य दृष्टीने कितीही चांगली कृती केली, तरी तिच्यामागील भाव काय आहे ? याकडे देवाचे लक्ष असते. यासाठी ‘ध्वनीचित्रीकरण चालू आहे’, या विचाराने ‘सतर्कता किती वाढते ?’, याचे निरीक्षण करा. हा भाव सतत टिकून रहाण्यासाठी ‘ध्वनीचित्रीकरण चालू आहे’, ‘भगवंत प्रत्येक गोष्टीची नोंद घेतो’, असे लिहिलेली पट्टी भ्रमणभाष, संगणक यांवर, तसेच प्रत्येक खोली, नित्याचे उपयोगी साहित्य इत्यादी ठिकाणी लिहून ठेवू शकतो. जेणेकरून आपल्याला सतत आठवण होईल. त्यामुळे त्याविषयीचे गांभीर्य आणि सतर्कता वाढेल. हे स्वभावदोष, अहं-निर्मूलन आणि भावजागृतीच्या प्रयत्नाला पुष्कळ पोषक आहे.

‘हे श्रीमन्ननारायणा, गुरुदेवा, प्रत्येक साधकाला ‘देवाचे आपल्याकडे सतत लक्ष आहे, तो या माध्यमातून साधनेत अखंड साहाय्य करत आहे’, याची जाणीव होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. आपण हा विषय सुचवून लिहून घेतला, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.७.२०१८)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.