‘काही साधकांना वाटते, ‘दायित्व असलेल्या साधकांना ‘मी साधनेचे चांगले प्रयत्न करतो’, असे वाटायला हवे, तरच त्यांनी पुढे प्रमुख-सेवकांना सांगितल्यावर माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होईल.’ या विचारामुळे ते दायित्व असलेल्या साधकांसमोर स्वतःची प्रतिमा चांगली भासवण्याचा प्रयत्न करतात. मात्र एखाद्या वेळी दायित्व असलेल्या साधकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडून कृती झाली नाही किंवा सेवेत चुका झाल्या, तर ‘आता दायित्व असलेल्या साधकांना माझ्याविषयी काय वाटेल ? माझी प्रगती आता होणार नाही’, अशा विचारांनी ते त्रस्त होतात. यामुळे काही वेळा त्यांना ताण किंवा नकारात्मकताही येते. त्यांचे हे विचार अयोग्य का आहेत, हे पुढील दृष्टीकोनांवरून लक्षात येईल.
१. साधकाची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे, हे ईश्वरनियोजित असते.
२. अध्यात्मामध्ये आपले खरे नाते हे गुरु किंवा ईश्वर यांच्याशी असते. त्यामुळे साधकांनी दायित्व असलेल्या साधकांचे मन सांभाळण्यापेक्षा गुरु किंवा ईश्वर यांना अपेक्षित अशी साधना करून त्यांचे मन जिंकायचा प्रयत्न करायला पाहिजे.
३. ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषामुळे प्रगती तर होणार नाहीच, उलट अधोगती होईल.
४. सूर्य उगवला की, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि तो सर्वांना दिसतोच. त्याप्रमाणे साधकाची साधना अंतर्मनातून चांगली चालू असेल, तर त्याच्या अंतरातील साधना-दीप प्रदीप्त होतो आणि त्याचा प्रकाश पसरून तो दिसतोच. थोडक्यात साधकांची आध्यात्मिक प्रगती इतरांच्याही लक्षात येते. त्यामुळे साधकांनी स्वतःच्या प्रगतीविषयी वृथा विचार न करता साधनेचे प्रयत्न चांगले करण्यावर भर द्यावा.’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१४.११.२०२०)