मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने कोरोना केंद्र म्हणून शाळा कह्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचे सॅनिटायझेशन होणे आवश्यक आहे. आता हळूहळू या केंद्रांची संख्या अल्प झाली आहे. अजून अनेक शाळांचे सॅनिटायझेशन झालेले नाही. त्यामुळे तेवढा कालावधी मिळणे हे प्रशासनासाठी आवश्यक आहे, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
शाळा चालू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
मुंबई – महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; तथापि शाळा चालू करत असतांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊनच शाळा चालू कराव्यात. अधिकार्यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील शाळा चालू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.